पुणे: महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मिळकतकराची सर्व देयके तयार केली असून, नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.
ही सवलत 31 मेपर्यंत लागू राहणार असून, दिलेल्या मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांनाच तिचा लाभ मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय, नागरिकांना बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि कॉसमॉस बँकेत मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी शक्यतो ऑनलाइन कर भरावा, असे आवाहन करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख उपाआयुक्त रवी पवार यांनी केले आहे.