पुणे: ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महापालिका सज्ज झाली आहे. या स्पर्धेसाठी शहरातील तब्बल 75 कि.मी.वरील रस्ते नव्याने बांधण्यात येणार आहेत. यासाठी 145 कोटी रुपयांचा खर्च येणार असून, विनाअडथळा स्पर्धेसाठी या मार्गातील 200 स्पीडबेकर काढण्यात येणार आहेत. 400 ड्रेनेजची झाकणे समतल केली जाणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवरील पुणे ग्रॅण्ड चॅलेंज 2026 ही सायकल स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा तब्बल 55 कि.मी.चा मार्ग हा शहरात जातो, तर 22 कि.मी.चा भाग हा पुणे कॅन्टोन्मेंट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून जातो. (Latest Pune News)
या एकूण 75 कि.मी. मार्गांचे या स्पर्धेसाठी नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सुमारे 145.75 कोटी रुपये खर्च करणार असून, चार टप्प्यात ही कामे केली जाणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. एका ठेकेदाराला एक टप्पा अशा पद्धतीने रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे पावसकर म्हणाले. या कामांमुळे पुण्यातील रस्त्यांची ‘राइड क्वालिटी’ आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
गुणवत्ता व वेळेवर करावी लागणार कामे पूर्ण
महापालिकेने ठेकेदारांसाठी काटेकोर अटी ठेवल्या आहेत. एका ठेकेदाराला केवळ एकाच पॅकेजचे काम मिळेल. काम 60 दिवसांत पूर्ण न झाल्यास दररोज 50 हजार दंड व 5 वर्षांची ब्लॅकलिस्टिंग होणार आहे. ठेकेदाराकडे 120 ‘टीपीएच’ क्षमतेचा हॉटमिक्स प्लांट 35 कि. मी. परिघात असणे बंधनकारक आहे. तसेच 2 पॅवर्स, 2 बिटुमेन डिस्ट्रिब्यूटर, 4 व्हायबेटरी रोलर्स व एक मिलिंग मशीन असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चार पॅकेजमध्ये होणार कामे
पॅकेज 1 : 9,67 कि. मी. रस्ते सुधारणा, खर्च सुमारे 30.80 कोटी रुपये. पॅकेज 2 : 28.53 कि.मी. रस्ते (पुणे विद्यापीठ चौक, औंध, राजीव गांधी पूल, एफसी रोड, जेएम रोड, नाल स्टॉप इ.) - खर्च 32.67 कोटी रुपये. पॅकेज 3 : 14.32 कि.मी. रस्ते (शास्त्री रोड, तिलक रोड, बाजीराव रोड, नेहरू रोड, स्टेशन रोड आदी) - खर्च 38.22 कोटी रुपये. पॅकेज 4 : 22.47 कि.मी. रस्ते (ईस्ट स्ट्रीट, पुलगेट, गुलाबी मैदान, लुल्लानगर ते येवलेवाडी-बोपदेव घाट मार्ग) - खर्च 44.5कोटी रुपये.
महापालिका करणार ही कामे!
सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचे रिसरफेसिंग व खराब भागांची दुरुस्ती. सुमारे 200 स्पीड बेकर काढले जाणार आहेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत व सायकलिंग स्पर्धा सुरक्षित होईल. 400 हून अधिक चेंबर कव्हर्स आणि ग्रेटिंग्ज बदलून रस्ता समतल केले जाईल. फुटपाथ व मध्यरेषांची (मेडियन) दुरुस्ती व रंगरंगोटी. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते संकेतफलक (साइन) बसविणे. सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स व रेलिंग्स बसविणे