पावसाचा वीजयंत्रणेला तडाखा; झाडपडीमुळे पुरवठा खंडित Pudhari File Photo
पुणे

Pune: पावसाचा वीजयंत्रणेला तडाखा; झाडपडीमुळे पुरवठा खंडित

अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहर व परिसरात मंगळवारी (दि. 20) सायंकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी दिली. विविध ठिकाणी झाडपडीचे प्रकार तसेच जमिनीवरून वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या लोंढ्यांनी वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला.

यात प्रामुख्याने कोंढवा परिसरासह पुणे शहरातील काही भागांत तसेच भोसरी व चाकण परिसरामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला, तर कोंढवा परिसरात बुधवारी (दि. 21) पहाटे टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. (Latest Pune News)

पुणे शहरात प्रामुख्याने कोंढवा परिसर मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. चढउतार असलेल्या या भागात वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे 38 फीडर पिलरमध्ये पाणी शिरले. वीज सुरक्षेची खबरदारी म्हणून कोंढवा, जेके पार्क व कुमारपाम या तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

त्यामुळे कोंढवा परिसरातील सुमारे 38 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. पाऊस व पाणी ओसरल्यानंतर महावितरणचे अभियंते व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली. पाणी शिरलेल्या फीडर पिलरमधील पाणी काढून कोरडे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने या परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला तसेच वीज खाबांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे तारा तुटल्या. त्यामुळे महर्षिनगर, मार्केट यार्ड, प्रेमनगरचा काही भाग, मुंढवा, बंडगार्डन, फुरसुंगी, कोथरूड, शिवणे, धानोरी, धायरी फाटा आदी भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

याच कारणांमुळे भोसरीगाव, तळवडे, देहूगाव, शेलारवस्ती, चिखली, चर्‍होली, दिघी, यमुनानगर, विठ्ठलवाडी, रुपीनगर, आळंदी रोड, इंद्रायणीनगर, चिंचवड स्टेशन, संतनगर, आदर्शनगर, खडी मशिन, शांतीनगर या भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या सर्व भागांतील वीजपुरवठ्याची तातडीने दुरुस्तीकामे करून रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये चाकण व परिसरात मुसळधार पावसामुळे महावितरणचे उच्च व लघुदाबाचे 10 वीजखांब कोसळले. त्यामुळे चाकण, कुरुळी, निघोजे, सारा सिटी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला आहे.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

वीजपुरवठा खंडित होणे किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचार्‍यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते.

यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याची किंवा संदेश टाईप करून 9930399303 या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT