पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुणेकर त्रस्त असताना ते बुजविण्यासाठी आवश्यक डांबरी मिश्रणाचा पुरवठाच अपुरा पडत असल्याने महापालिकेच्या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला 'ब्रेक' लागला आहे. महापालिकेचा येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने शनिवारी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्य पथ विभागाला मिळून अवघे २८० टन डांबरी मिश्रण मिळाले. त्यामुळे निधी आणि ठेकेदार उपलब्ध असूनही खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या मालकीचा येरवडा येथील प्लांट शहरातील डांबरीकरणाच्या कामांसाठी महत्त्वाचा आधार आहे. या प्लांटची प्रतितास १२० टन उत्पादन क्षमता आहे. खड्डे बुजविणे, रस्त्यांची डागडुजी आणि पुनर्डांबरीकरणासाठी येथून डांबरी मिश्रण पुरविले जाते. मात्र, प्लांट जुना झाल्याने तो पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यातच प्लांटला नागरिकांचा विरोध असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डांबरीकरणाच्या कामात वारंवार व्यत्यय
पावसाळ्यात खडी भिजल्याने उत्पादनावर परिणाम होतो. डांबर, एलडीओ, इमल्शन आणि थर्मिक ऑइलचा सातत्याने पुरवठा आवश्यक असताना त्यातही अडथळे येतात. गेल्या महिन्यात महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्याने प्लांटचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामात वारंवार व्यत्यय येत आहे. दरम्यान, १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला २.४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
निविदाप्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, आवश्यक डांबरी मिश्रणाचा पुरवठा न झाल्याने कामे संथ झाली आहेत. एकीकडे जुना प्लांट पूर्ण क्षमतेने चालत नाही, तर दुसरीकडे नव्या हॉटमिक्स प्लांटलाही नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे महापालिका दुहेरी कोंडीत सापडली असून, खड्डे बुजविण्याच्या कामाचा वेग वाढविण्याचे आव्हान कायम आहे.
क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. निविदेनुसार ठेकेदारांकडून हॉटमिक्स व कोल्डमिक्स माल घेणे अपेक्षित आहे. येरवडा प्लांट जुना असल्याने तो पूर्ण क्षमतेने चालविता येत नाही. पावसामुळेही डांबरी मिश्रणाच्या उत्पादनावर परिणाम होतो. मात्र, शहरातील खड्डे बुजविण्यासाठी मालाची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. नवीन हॉटमिक्स प्लांट सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.रोहिदास गव्हाणे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग