Pothole Pudhari
पुणे

Pune Pothole Update: पुणे खड्डेमुक्त झाल्याचा PMC चा दावा! 15 दिवसांत 1,134 खड्डे बुजवले; 'रोडमित्र' ॲपही बंद

महापालिकेचा 54 खड्डेच शिल्लक असल्याचा दावा; मात्र नागरिकांचा अनुभव वेगळाच, ऐन पावसाळ्यात 'PMC रोडमित्र' ॲप बंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असताना महापालिकेने अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल १,१३४ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. ७ ते २१ जुलैदरम्यान शहरात नोंदविलेल्या १,१८८ खड्ड्यांपैकी केवळ ५४ खड्डे शिल्लक राहिले असून, तेही १ ऑगस्टपर्यंत दुरुस्त करण्यात येतील, तसेच संपूर्ण पुणे खड्डेमुक्त केले जातील, असा दावा पथ विभागाने केला आहे. मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर अद्याप खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने महापालिकेच्या आकडेवारीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोल्ड मिक्स बॅगच्या साहाय्याने ६३४ चौरस मीटर क्षेत्रातील खड्डे बुजविण्यात आले, तर हॉट मिक्स प्लांटद्वारे २,०८८ चौरस मीटर डांबरीकरण केल्याचा दावा केला आहे. खड्डेदुरुस्तीसाठी १६२ ठिकाणी पाण्याचा निचरा केला असून, ८५७ चौरस मीटर क्षेत्रात मुरूम, जीएसबी आदी साहित्याचा वापर केल्याचे नमूद केले आहे. तसेच, ६२ चौरस मीटर क्षेत्रात पेव्हिंग ब्लॉकद्वारे दुरुस्ती केल्याची माहिती दिली आहे.

अहवालानुसार, सर्वाधिक खड्डे वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आढळले. येथे १९४ पैकी १९४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. कोंढवा-धनकवडी भागात ३५८, हडपसर-मांजरीमध्ये १२७, वारजे-कर्वेनगरमध्ये १०४, कोथरूड-बावधनमध्ये ६८, औंध-बाणेरमध्ये ५९, बिबवेवाडीत ७३, सिंहगड रस्त्यावर २६, येरवडा-वडगाव शेरीमध्ये ३५ आणि नगररोड परिसरात १३ खड्ड्यांची दुरुस्ती झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

मात्र, महापालिकेच्या दाव्यांनंतरही नागरिकांचा अनुभव वेगळाच आहे. कर्वे रस्ता, नगर रस्ता, कात्रज-कोंढवा मार्ग, हडपसर परिसर, सिंहगड रस्ता आणि उपनगरांतील अनेक रस्त्यांवर वाहनचालकांना दररोज खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कोल्ड मिक्स टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असली तरी पुढील पावसात तेच खड्डे पुन्हा उखडत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहनांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे “शहरात फक्त ५४ खड्डे शिल्लक” हा दावा वास्तवाशी कितपत सुसंगत आहे, याची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कागदोपत्री खड्डेमुक्ती आणि प्रत्यक्षातील विदारक रस्ते यांतील तफावत पुन्हा एकदा महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहे.

पावसाळ्यातच खड्ड्यांच्या तक्रारीसाठीचे पीएमसी रोडमित्र ॲप बंद

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेने गाजावाजा करून सुरू केलेले 'पीएमसी रोडमित्र ॲप' ऐन पावसाळ्यातच बंद पडले आहे. त्यामुळे आता खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरिकांवर पुन्हा महापालिकेच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी नागरिकांना थेट ऑनलाइन पद्धतीने करता याव्यात आणि त्या माध्यमातून तत्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने गतवर्षी पीएमसी रोडमित्र ॲप सुरू केले. स्वत: आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, अवघ्या एका पावसाळ्यानंतर हे ॲप पुन्हा बंद पडले. त्यातच आता पाऊस सुरू असून, अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, आता ॲप बंद असल्याने नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी करता येत नाहीत. याबाबत महापालिकेचे पथ विभागप्रमुख राजेश बनकर यांनी हे ॲप पुन्हा लवकरच सुरू होईल, असे उत्तर दिले.

पावसाळ्यात रस्तेदुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत बहुतांश नोंदविलेले खड्डे बुजविण्यात आले असून, उर्वरित ५४ खड्ड्यांची दुरुस्ती १ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासोबतच पुढील १० दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सतत पाहणी आणि तातडीच्या दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT