पुणे

Pune Porsche Accident | डॉ. तावरे अन् अगरवाल दाम्पत्यांना संपर्कात आणणार्‍या मध्यस्थाचा शोध

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कार चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात विशाल आणि शिवानी अगरवाल या दाम्पत्याने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला. तसेच, त्याला भेटून रक्तनमुना बदलण्याबाबत आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर याला कोणी मार्गदर्शन केले, यासह विविध मुद्द्यांचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी (दि. 2) विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाला दिली.

आई-वडिलांना अटक

या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय 50) आणि आई शिवानी विशाल अगरवाल (वय 49, दोघेही रा. बंगला क्र. 1, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना शनिवारी (दि. 1) अटक करण्यात आली. शिवानी यांनी मुलाऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

वडिलांच्या सांगण्यावरून सूत्रे फिरवली

विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याने शिवानी यांचे रक्त घेतल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशालला अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता. त्यानुसार विशालला शनिवारी संध्याकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला रविवारी (दि. 2) दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने अगरवाल दाम्पत्याला बुधवार (दि. 5) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रक्ताचा नमुना घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविणार

अगरवाल दाम्पत्याच्या रक्ताचा नमुना घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवायचा आहे. विशाल अगरवालने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोरला दिले आहेत. त्या व्यक्तींची माहिती घ्यायची आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हाळनोरने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सीरिंज आणि मूळ रक्ताचा नमुना अगरवाल पती-पत्नीकडे दिला काय, याचा तपास करायचा आहे.

तसेच, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी गुन्ह्यातील सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

मुक्काम सुधारगृह, कोठडी अन् कारागृहात

कल्याणीनगर परिसरातील आलिशान बंगल्यात राहणार्‍या अगरवाल कुटुंबीयांमधील अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. तर, त्याची आई शिवानी व वडील विशाल, हे सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याने पोलिस कोठडीत आहेत. तर, आजोबा सुरेंद्रकुमारचा मुक्काम येरवडा कारागृहात आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे आणखी आरोपींचा सहभाग निष्पन्न

रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. त्या फुटेजची पाहणी केली असता त्यातून महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT