पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील 38 वर्षीय आरोपीवर ससून सर्वोपचार रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली आहे. छातीत वेदना जाणवत असल्याने 23 ऑक्टोबर रोजी त्याला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले होते. उपचारांनंतरही रुग्णालयात पुन्हा दाखल होण्यासाठी आरोपीकडून धडपड सुरू असल्याचे समजते.(Latest Pune News)
आरोपीला छातीत दुखत असल्याचा त्रास सुरू झाल्याने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान आरोपीवर रक्त पातळ करण्याचे उपचार (थोम्बोलाईस) करण्यात आले. डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र, आरोपी व त्याच्या पत्नीने त्याला संमती न दिल्यामुळे 26 ऑक्टोबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुन्हा ससूनमध्ये दाखल करण्यात आले.
त्याच्यावर 27 ऑक्टोबर रोजी अँजिओग्राफी करण्यात आली असता हृदयातील एका शिरेत 85 टक्के अडथळा आढळला. त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करून उपचार पूर्ण करण्यात आले. या उपचारानंतर आरोपीला 29 ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ससून रुग्णालयातील सूत्रांनी दिली. मात्र, आरोपीला अद्याप त्रास होत असल्याने ससूनमध्ये पुन्हा दाखल करून घेण्यात येण्यासाठी पत्नीने अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले.