पुणे: पोलिसांवरील वाढता कामाचा ताण आणि प्रत्येक पोलिस ठाण्यास लागणारे मनुष्यबळ लक्षात घेता, गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुणे पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर एफआयआर नोंदणीसाठी ‘व्हॉइस टू वर्ड’ एआय समाविष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग केला जाणार असून, यामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे.
एका खासगी कंपनीमार्फत विकसित करण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस)मधील आवश्यक कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तक्रारीतील मजकुराच्या आधारे संबंधित गुन्ह्यास लागू होणारी योग्य कलमे प्रणाली सुचवणार आहे.
त्यानुसार काही मिनिटांत एफआयआरचा मसुदा तयार होईल. मात्र, अंतिम नोंदणीपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. या उपक्रमामुळे तक्रारदाराचा वेळ वाचणार असून, पोलिसांनाही कामाचा वेग वाढविता येणार आहे.
गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कलमे निश्चित करणे आणि एफआयआरचा मसुदा तयार करणे, यातील किचकटपणा कमी होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील बाणेर पोलिस ठाण्यात या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
तक्रारदाराने दिलेली माहिती संबंधित अधिकारी प्रणालीत नोंदविताच, एआयच्या साहाय्याने काही मिनिटांत एफआयआर तयार होणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून गुन्हा नोंदविण्यात येईल. या नव्या तंत्रज्ञानामुळे गुन्हा नोंदणी प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहे.