Pune Police Sinhagad Trip Juveniles
पुणेः गुन्हेगारी वाटेवरून विधी संघर्षग्रस्त बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी संवेदनशील आणि विधायक पाऊल उचलले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी सिंहगडावर विशेष दुर्गभ्रमण, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. पोलिसांच्या विविध पथकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
या उपक्रमातून बालकांना गुन्हेगारीचा मार्ग सोडून शिक्षण, करिअर आणि जबाबदार नागरिकत्वाची कास धरण्याचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आला.
कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच विधी संघर्षग्रस्त बालकांच्या सुधारणा, पुनर्वसन आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या वातावरणात बालकांशी संवाद साधत त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करण्यात आले.
विधी संघर्षग्रस्त बालकांकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता त्यांच्यातील सकारात्मक क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचा पुणे पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून या मानवतावादी उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे बालगुन्हेगारीला आळा बसण्यासोबतच बालकांच्या पुनर्वसनाला चालना मिळून सुरक्षित आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीस हातभार लागणार आहे.
संवादात्मक समुपदेशन सत्रामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व, विविध करिअरच्या संधी, कौटुंबिक मूल्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा भविष्यातील आयुष्यावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्याची प्रेरणा बालकांना देण्यात आली.
या उपक्रमात 'से नो टू ड्रग्स, येस टू लाईफ'चा संदेश देत बालकांना व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विधी संघर्षग्रस्त बालकांच्या सुधारणा, पुनर्वसन आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्याकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता त्यांच्यातील सकारात्मक क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.डॉ. सागर कवडे, पोलिस उपायुक्त पुणे शहर