Police Recruitment Scam Pudhari
पुणे

Pune Police Recruitment Fake Certificates: कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा पोलिस भरतीत घोटाळा; १९ जणांची भरती, दोघांना अटक

खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा संशय; बनावट प्रमाणपत्रांसाठी ३ ते ५ लाखांचे ‘रेटकार्ड’

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कुराश आणि ड्रॅगनबोट, या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंसाठीच्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत पुणे शहर पोलिस दलात काही उमेदवार भरती झाले आहेत. कुराश खेळाच्या प्रमाणपत्रावर १९ उमेदवार भरती झाले असून, त्यातील ९ जण प्रशिक्षणासाठीही रवाना झाले आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. या बनावट प्रमाणपत्रांसाठी प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपयांचे ‘रेटकार्ड’ असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करीत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर (वय ४०, रा. चंडीगड; मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी, हडपसर; मूळ रा. कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच, परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख यांच्यासह अन्य जिल्ह्यांतील संघटक आणि काही व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ ते २०२६ या कालावधीत घडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस दलाच्या सन २०२४-२६ च्या भरतीत काही उमेदवार कुराश व ड्रॅगनबोट या खेळांचे खोटे प्रमाणपत्र मिळवून भरती झाल्याची माहिती एका व्यक्तीला मिळाली होती. त्यांनी याबाबत पोलिसांकडे अर्ज करीत काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत आरोपींनी प्रत्यक्षात २०१६ ते २०२६ या कालावधीत कुराश या खेळाच्या स्पर्धा कोणत्याही ठिकाणी न घेता त्या घेतल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली. प्रत्यक्षात जे उमेदवार कुराशचे खेळाडू नाहीत, हे माहीत असतानाही त्यांचा खेळाडूचा अभिलेख तयार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्या प्रमाणपत्राचा वापर करून या उमेदवारांनी विविध खात्यांत खेळाडू आरक्षणातून नोकरी मिळवली. कुराशवर पुणे शहर पोलिस दलात १९ जण भरती झाले आहेत. या उमेदवारांनी शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर भरतीच्या वेळी बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाच्या विविध विभागांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

कुराश असोसिएशनचे हे सर्व आरोपी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून पोलिस भरतीत या उमेदवारांना खेळाडू आरक्षणाचा फायदा घेता यावा म्हणून बनावट स्पर्धा घेतल्याचे दाखवले व पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्रांचे वाटप केले. आरोपींनी पात्र नसलेल्या लोकांना खेळाडू म्हणून दाखवले. अशी किती प्रमाणपत्रे त्यांनी वाटप केली आहेत, याचा देखील सखोल तपास पोलिस करीत आहेत. आरोपींनी काही ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी खाडाखोड करून तयार केली आहे. तर, काही ठिकाणी अगोदरच्या तारखा टाकून सहभागाची यादी तयार केली आहे. लेटरवर जिल्ह्याची नावे टाकताना देखील आरोपींनी चुका केल्या आहेत. स्पर्धेचा कालावधी दाखवताना त्यांनी जिल्ह्याचे बदललेले नाव टाकले आहे. वास्तविक, त्या वेळी जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले नव्हते.

कुराशची स्पर्धाच झाली नाही, तरी प्रमाणपत्रांचे वाटप

स्पर्धांच्या प्रमाणपत्रावर सचिव म्हणू एका व्यक्तीच्या सह्या वापरण्यात आल्या आहेत. ही व्यक्ती २०१६ पासून कोणत्याच कुराश स्पर्धेत सहभागी नाही तसेच आरोपींनी क्रीडा निरीक्षक हजर नसताना या स्पर्धा घेतल्या आहेत. आरोपींनी राजस्तरीय कुराश स्पर्धा घेतल्याचे कोणतेही रेकॉर्ड, शुल्काचे पावतीपुस्तक, विजेत्या खेळाडूंचे फोटो असे कोणतेच रेकॉर्ड सादर केले नाही. त्यामुळे २०१६ ते २०२३ या कालावधीत कुराश खेळाच्या स्पर्धा झाल्या नसताना देखील प्रमाणपत्रांचे वाटप केले.

क्रीडा विभागही पोलिसांच्या रडारवर

२०२० नंतर शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक राज्यस्तरीय स्पर्धेत शासनाचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. कुराश असोसिएशनने शासनाच्या क्रीडा संचालनालयास न कळवता परस्पर स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त खेळाडू योग्य प्रमाणपत्रधारक आहेत का, याची खात्री न करता क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी देखील शासनासह जनतेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्यांच्याकडे देखील चौकशी करणार आहेत.

कुराश या क्रीडाप्रकाराची बनावट प्रमाणपत्रे सादर करून काही उमेदवार खेळाडू कोट्यातून पोलिस भरतीत पात्र झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर, इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.
गौहर हसन, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT