पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्तालय येथे सोमवारी जानेवारी महिन्यातील ‘पीटीपी’ ॲप कारवाईतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे शहर वाहतूक शाखा मार्फत आयोजित या कार्यक्रमात ‘पीटीपी’ ॲपद्वारे सर्वाधिक वाहतूक नियमभंग नोंदविणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी जानेवारी महिन्यात ‘पीटीपी’ ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमांतर्गत पीपीसीआर व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने सर्वाधिक कारवाई करणाऱ्या पहिल्या पाच विजेत्यांसाठी बक्षीस योजना जाहीर करण्यात आली होती.
प्रथम पारितोषिक 50 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय 25 हजार, तृतीय 15 हजार, चतुर्थ 10 हजार आणि पंचम 5 हजार रुपये अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली. जानेवारी महिन्यातील विजेते फेरीत घोषित करण्यात आले होते. त्यांना अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘पीटीपी’ ॲपद्वारे प्रभावी कारवाई नोंदविणाऱ्या तीन अंमलदारांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आले.
‘पीटीपी’द्वारे 1 लाख 81 हजार 555 तक्रारी प्राप्त
आतापर्यंत 93 हजार 190 नागरिकांनी ॲपचा वापर केला असून, 1 लाख 81 हजार 555 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1 लाख 32 हजार 485 प्रकरणांची पडताळणी करून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 कोटी 83 लाख 37 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कार्यक्रमास सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून नागरिकांनी ‘पीटीपी’ ॲपचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.
रोख पारितोषिके देऊन केले कौतुक
पीटीपी ॲपद्वारे बाणेर येथील चैतन्य तल्लम यांनी 314 फोटो पीटीपी ॲपवर अपलोड केले. त्यापैकी 268 फोटो ग््रााह्य धरून त्यावर आधारित वाहतूक नियमभंग करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक चलन पाठविण्यात आले. त्यांनी सर्वाधिक वाहतूक नियमभंगाचे फोटो अपलोड केल्याने त्यांना पहिल्या क्रमांकाने गौरविण्यात आले. त्यांना 50 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. दुसरा क्रमांक शशांक एम यांना देण्यात आला. त्यांना 25 हजारांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी 236 फोटो अपलोड केले. त्यापैकी 218 चलन दंडात्मक चलन नागरिकांना पाठविण्यात आले. तिसरा क्रमांक संदीप साठे 238 चलन तर 217 चलनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वेळी त्यांना 15 हजारांचे पारितोषिक व प्रमाणप्रत्र प्रदान करण्यात आले. रंजितसिंग रघुवंशी यांना चौथ्या क्रमांकाचे 10 हजाराचे तर पाचव्या क्रमांकाचे 5 हजाराचे पारितोषिक ज्ञानेश सायखेडेकर यांना प्रदान करण्यात आले.