Police Pistol Theft Pudhari
पुणे

Pune Pistol Theft: पुण्यात पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून सात पिस्तुले चोरी; पोलिस ठाण्यासमोरच आरोपीचा ‘हॅण्ड्सअप’

कचरा वेचक फिरस्त्याने दरवाजा उचकटून पिस्तुले लांबवली; सहाही पिस्तुले सापडली, सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एका कचरावेचक फिरस्त्याने सात पिस्तुले चोरी केली. त्याने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला हॅण्ड्‌सअप केले. त्यावेळी पिस्तूलचोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून राकेशकुमार संजयकुमार चिटेकर (मूळ कलबुर्गी, कर्नाटक) याला अटक केली. हा प्रकार शनिवारी (दि. २९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीतील मुद्देमाल कक्षात घडला आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बंडगार्डन पोलिसांचा सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीच्या एका खोलीत मुद्देमाल कक्ष आहे. आरोपी राकेशकुमार हा मूळचा कर्नाटकमधील कलबुर्गीचा राहणारा आहे. पुण्यात तो फिरस्ता असून, त्याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो कचरा गोळा करत करत मुद्देमाल कक्षाच्या खोलीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उचकटून आत गेला. तेथे त्याने सुरुवातीला काही बीअरच्या बाटल्या चोरी केल्या. बीअरवर ढोसल्या. त्यानंतर त्याने तेथील सात पिस्तुले चोरी केली. दिवसभर ही पिस्तुले तो सोबत घेऊन फिरत होता.

फिरत फिरत राकेशकुमार साधू वासवानी चौकातून बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या समोर आला. त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. त्याने एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून हॅण्ड्‌सअप म्हटले. त्या व्यक्तीने ही माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. पोलिस त्याला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. दरम्यान, पोलिस ठाण्यातील एका चाणाक्ष पोलिसाची नजर त्या पिस्तुलावर गेली. पिस्तुलावर बीएल असे लिहिले होते. त्या पोलिसाने ओळखले हे पिस्तूल गुन्ह्यात जप्त केलेले आहे. बंडगार्डन पोलिस खडबडून जागे झाले. त्यांनी राकेशकुमारकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने सेंट्रल बिल्डिंगसमोरील एका इमारतीच्या खोलीतून हे पिस्तूल चोरी केल्याचे सांगितले. एवढेच नाही तर आणखी काही पिस्तुले आपल्याकडे एका पिशवीत होती. ती पिशवी रस्त्यावर पडली, असेही तो म्हणाला.

पोलिसांनी जेव्हा राकेशकुमारला ताब्यात घेतले, तेव्हा त्याची पिशवी रस्त्यावर पडली होती. त्या पिशवीकडे पोलिसांचे लक्ष गेले नव्हते. पोलिस जेव्हा ती पिशवी शोधायले गेले, त्यावेळी ती मिळून आली नाही. ती पिशवी दुसऱ्या एका फिरस्त्याने उचलून पोबारा केला होता. सहा पिस्तुलांचा शोध रात्रभर बंडगार्डन पोलिस घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, एक व्यक्ती ती पिशवी उचलून घेऊन जाताना दिसला. त्याचा माग काढत पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसचा परिसर गाठला. एका झाडात ती पिशवी पोलिसांना मिळून आली. पिशवी उघडून पाहताच सहा पिस्तुले त्यामध्ये होती. पिस्तुले मिळताच बंडगार्डन पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 2022 मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या एका कारवाईत ही सात पिस्तुले जप्त केल्याची माहिती आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली होती. त्यामुळे येथील मुद्देमाल कक्षात ही पिस्तुले ठेवण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेला मुद्देमाल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असताना मुद्देमाल कक्षाचा दरवाजा उचकटून एक फिरस्ता आत शिरतो आणि सात पिस्तुले घेऊन भरदिवसा निघून जातो, हा प्रकार पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे चोरी केलेल्या पिस्तुलांपैकी एका पिस्तुलाचा धाक दाखवत आरोपीने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला ‘हॅण्ड्सअप’ केले. ही पिस्तुले एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या हाती लागली असती, तर त्यातून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. सुदैवाने सहाही पिस्तुले पोलिसांच्या हाती लागली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, मुद्देमाल कक्षाच्या सुरक्षेबाबतचा हा प्रकार पोलिसांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार चिटेकर याला अटक केली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्‍यांनी सांगितले की, मुद्देमाल कक्षाजवळ एक व्‍यक्‍ती काही तरी करताना मिळून आला होता. त्‍याला आम्‍ही ताब्‍यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT