NAFIS System Pudhari
पुणे

NAFIS System India: ‘नाफीस’ प्रणालीकडे पुणे पोलिसांचा कल; गुन्हेगारांची माहिती एकाच क्लिकवर

‘ॲम्बीस’वरून ‘नाफीस’कडे स्थलांतर; तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुन्हेगारांची कुंडली जतन करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस आतापर्यंत ॲम्बीस (ऑटोमेटेड मल्टि-मॉडेल बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम) या प्रणालीचा वापर करत होते. मात्र, आता केंद्रीय स्तरावर नव्याने तयार करण्यात आलेल्या ‌‘नाफीस‌’ (नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम) या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी देखील त्यांच्याकडील ‌‘ॲम्बीस‌’ प्रणालीवरील रेकॉर्डवर असलेल्या सर्व गुन्हेगारांची माहिती ‌‘नाफीस‌’ प्रणालीवर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे.

वाढत्या स्मार्ट गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना देखील आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे. अनेकदा बाहेरच्या राज्यातील गुन्हेगार महाराष्ट्रात येऊन गुन्हे करून पसार होतात. प्रामुख्याने घरफोडी, लुटमार, चोरी असे गुन्हे हे आरोपी करतात. त्यामुळे एकाच केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या प्रणालीतील सर्व गुन्हेगारांची माहिती मिळाली, तर पोलिसांना तपासात मोठी मदत होईल.

‌‘ॲम्बीस‌’ प्रणाली सुरू होण्यापूर्वी पोलिस गुन्हेगारांचे ठसे कागदावर घ्यायचे, त्याच्या चेहऱ्याची चेहरापट्टी घ्यायचे. हे सर्व रेकॉर्ड कागदोपत्री ठेवावे लागत होते. परंतु ‌‘ॲम्बीस‌’ प्रणाली आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे प्रथमच डिजिटल रेकॉर्ड तयार होऊ शकले. आता तर नवीन भारतीय न्याय संहितेत (बीएनएस), तर घटनास्थळाचा डिजिटल पंचनामा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पोलिस दलात गुन्हेगारांची स्मार्ट कुंडली तयार केली जाते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

काय आहे ‌‘नाफीस‌’ प्रणाली

‌‘नाफीस‌’ ही प्रणाली ‌‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो‌’च्या माध्यमातून तयार केली आहे. तिलाच राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली असे देखील म्हणतात. या प्रणातील एकाच वेळी देशातील सर्व गुन्हेगारांची कुंडली पोलिसांना मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराला दहा अंकांचा राष्ट्रीय फिंगरप्रिंट क्रमांक दिला जातो. त्यामुळे आंतरराज्यीय घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

‌‘ॲम्बीस‌’ची अशी आहे कार्यप्रणाली

सन 2019 पासून महाराष्ट्र पोलिस गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ‌‘ॲम्बीस‌’ प्रणालीचा वापर करत आहेत. ‌‘ॲम्बीस‌’ ही महाराष्ट्र पोलिसांची अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रणाली आहे. जी गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ आणि चेहऱ्यांची ओळख याद्वारे आरोपींची ओळख पटवते. स्वत:ची अशी प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ही प्रणाली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने विकसित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT