पुणे: शंतनु कुकडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची चौकशी पुणे पोलिसांनी केली आहे. आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपावरून ही चौकशी करण्यात आली आहे. कुकडेचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता- पुत्रांच्या खात्यात पावणेदोन कोटी रुपये आले आहेत.
दरम्यान, विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कुकडेवर दोन गुन्हे समर्थ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. अशातच कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपये पोलिसांना आढळून आले असून, त्यातील 40 ते 50 कोटी रुपये विविध व्यक्तींच्या खात्यांवर गेल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले. आता त्याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Latest Pune News)
कुकडेविरुद्ध गुन्ह्याचा तपास समर्थ पोलिसांकडे आहे, तर प्रकरणाचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेकडूनही याचा समांतर तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. मागील आठवड्यात मानकर यांची चौकशी करण्यात आली आहे. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांत आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आयकर, ईडीला पोलिसांचे पत्र
शंतनु कुकडेच्या खात्यात तब्बल शंभर कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. चेन्नई येथे एक कंपनी असून, त्या कंपनीचा कुकडे हा डायरेक्टर होता. त्या कंपनीच्या शेअरद्वारे हे पैसे आपल्या खात्यात आल्याचे कुकडे सांगतो. त्याच्या खात्यातून चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
हे पैसे दहा ते पंधरा व्यक्तींच्या खात्यात गेले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी याबाबत आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांना पत्र लिहिले आहे. तसेच कुकडेच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
सामूहिक बलात्काराचे कलम वाढवले
कुकडेबाबत दाखल असलेल्या दुसर्या गुन्ह्यात सामूहिक बलात्काराचे कलम वाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिलांच्या खात्यात देखील पैसे गेल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
रौनक जैनच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एक जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनकसोबत झाला आहे. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनु कुकडेचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हा आमच्या राजकीय बदनामीचा कट आहे. विनाकारण माझी बदनामी करणार्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे.- दीपक मानकर, शहराध्यक्ष, रा. काँ. पुणे शहर
शंतनु कुकडे प्रकरणाच्या मनिट्रेलच्या अनुषंगाने दीपक मानकर यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी चार एकर जमिनीच्या व्यवहारापोटी ही रक्कम दिल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.- संदीपसिंह गिल्ल, पोलिस उपायुक्त, परिमंडल 1