

पुणे: महापालिका प्रशासनाला कल्पना न देता केवळ पोलिसांच्या परवानगीने सिंहगड रोड व कर्वेनगरला जोडणारा छत्रपती राजाराम पूल वाहतुकीसाठी बंद करणे ठेकेदाराला भोवले आहे. हा पूल परस्पर बंद केल्याने पालिकेच्या वाहतूक विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवली असून, तीन दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
राजाराम पुलाचे एक्स्पान्शन जॉइंटचे काम करण्यासाठी पुलाची एक बाजू महिनाभरासाठी बंद करण्यात येणार आहे. ही बाजू बंद केल्यानंतर काय परिणाम होतील, हे पाहण्यासाठी सोमवारी (दि. 28) पुणेकरांना वेठीस धरण्यात आले होते. (Latest Pune News)
मात्र, हे काम करणार्या द फ्रेसीनेट प्रेस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीने महापालिका प्रशासनाला कसलीही कल्पना न देता सोमवारी सकाळी छत्रपती राजाराम पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करून एक्सपान्शन जॉइंटचे काम सुरू केले. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर व कर्वेनगरमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने राजाराम पुलाचे काम अर्ध्या तासात बंद करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला.
महापालिका प्रशासनावर यामुळे टीका झाल्याने प्रकल्प विभागाने काम करणार्या द फ्रेसीनेट प्रेस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच, तीन दिवसांत खुलासा करण्यास देखील सांगितले आहे. जर खुलासा दिला नाही तर निविदेतील अटी व शर्तींनुसार कारवाई केली जाणार आहे.
दोन महिने चालणार काम
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहरातून वाहणार्या नदीवरील विविध पूल व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये 11 पुलांचे बेअरिंग व एक्सपान्शन जॉइंटचे काम करावे लागणार आहे. त्यानुसार प्रकल्प विभागाने पूना हॉस्पिटल, एस. एम. जोशी आणि संगमवाडी येथील पुलाचे काम केले आहे. छत्रपती राजाराम पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटचे काम केले जाणार आहे. या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक महिना बंद करून हे काम केले जाणार आहे. त्यानंतर दुसरी बाजू बंद ठेवून दुसर्या बाजूचे काम केले जाणार आहे. हे काम दोन महिने चालणार आहे.