Pune Police Extortion Case Pudhari
पुणे

Pune Police Extortion: पुण्यात पोलिसांचा खंडणी घोटाळा उघड; बडतर्फीची कारवाई निश्चित

खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणात अनेक पोलिसांवर निलंबन व बडतर्फीची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मंगळवार पेठेतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून खंडणी उकळणारा पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगेसह, आयटी अभियंता तरुण-तरुणींना ब्लॅकमेल करून दहा हजार रुपये उकळणाऱ्या तिघा पोलिसांवर बडतर्फीची कारवाई होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांची गय केली जणार नाही. कोणी असे समजू नये, की आम्ही येथे डोळ्यावर पट्टी बांधून बसलोय. कोणाच्याही चुकीला माफी नाही. त्यामुळे त्या सहा पोलिसांना पोलिस खात्यातून काढून टाकले जाईल, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. पीएसआय अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे या तिघांनी एका प्राचार्यांना ब्लॅकमेल करून पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळली.

अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार येताच त्यांनी याबाबत मोठी ॲक्शन घेत या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या तिघांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. एवढी कारवाई त्यांच्याबाबत पुरेशी नसल्याचे सांगत अमितेश कुमार यांनी या तिघांवर बडतर्फीची (पोलिस खात्यातून काढून टाकणे) कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. वाघोली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे या तिघांनी आयटी अभियंता मित्र-मैत्रिणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दहा हजार रुपये उकळले.

तरुणाला मारहाण देखील केली. पैसे उकळण्याचा हा प्रकार समोर येताच तिघांवर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अभियंता तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त सोमय मुंडेंना याबाबत चौकशी करण्याचे अमितेश कुमारांनी आदेश दिले होते. त्यांच्या चौकशीत या तिघांनी रात्रपाळी कर्तव्यावर असताना नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या कॉलची पूर्तता करत असताना तरुण-तरुणीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. कॉलच्या अनुषंगाने जर असा काही प्रकार होता तर, त्या दोघांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते. परंतु या पोलिसांनी असे न करता त्यांना धमकावून तरुणाकडून एका गॅरेजवाल्याच्या फोन पेवर दहा हजार रुपये घेतले.

खंडणीचा गुन्हा दाखल होताच तिघे फरार

खंडणीचा गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिल्सस्टार पोलिस सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे हे तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या तिघांवर सध्यातरी अटकेची तलवार टांगती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT