Pune Police Drug Disposal Pudhari
पुणे

Pune Police Drug Disposal: पुणे पोलिसांचा ड्रग्जवर घणाघात!; ४ कोटींचे ४५५ किलो अमली पदार्थ केले नष्ट

२३ पोलिस ठाण्यांतील १२३ एनडीपीएस गुन्ह्यांत जप्त मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट; गांजा, एमडी, हेरॉईनसह विविध पदार्थांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘ड्रग्जमुक्‍त भारत’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेच्या दिशेने पुणे शहर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. शहरातील २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल ४ कोटी ११ लाख ९१ हजार ७६५ रुपये किमतीचा ४५५ किलो ८४५ ग्रॅम ९४६ मिलीग्रॅम अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. रांजणगाव एमआयडीसी येथील कारखान्यात मंगळवारी (दि. २५) ही कारवाई केली.

‘ड्रग्ज डिस्‍पोजल कमिटी’च्या परवानगीने आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जप्त मुद्देमालाची कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २३ पोलिस ठाण्यांच्या दाखल असलेल्‍या १२३ अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात अमली पदार्थविरोधी पथक-१ मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण, पोलिस उपनिरीक्षक योगेश कोतकर यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

गांजा, एमडी, हेरॉईनसह विविध पदार्थांचा समावेश

नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालात ४२५ किलो ४७२ ग्रॅम गांजा (किंमत ८५ लाख ९ हजार ४५६ रुपये), १ किलो १५७ ग्रॅम एमडी (२ कोटी ३१ लाख ४५ हजार ७२० रुपये), १२७ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम मेथॅम्फेटामाइन(२५ लाख ५० हजार रुपये), ६५ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम हेरॉईन (२२ लाख ९२ हजार ५०० रुपये) यांचा समावेश आहे.

याशिवाय २०० ग्रॅम ओजीकुश गांजा, १०० ग्रॅम ८७० मिलीग्रॅम चरस, ६५ ग्रॅम ८० मिलीग्रॅम हशिश ऑईल, २४ किलो ८४७ ग्रॅम अफू/दोडाचुरा, तसेच नायट्राझेपम व अल्प्राझोलमच्या गोळ्या नष्ट करण्यात आल्या. ब्राऊन शुगर, गर्द पावडर आणि गांजामिश्रित पदार्थांचाही जप्त मुद्देमालात समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT