पुणेः अहिल्यानगर पोलिसांच्या केंद्रीय मुद्देमाल कक्षातील अल्प्राझोलम हा अमली पदार्थ चोरी करून बाहेर विक्री केल्याच्या प्रकरणात पोलिस हवालदारच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. शामसुंदर विश्र्वनाथ गुजर (वय.39,रा. नेप्ती) असे त्याचे नाव आहे. पोलिसच अमली पदार्थाच्यता तस्करीत एकच खळबळ उडाली आहे. त्याने विक्रीसाठी बाहेर काढलेला अल्प्राझोलम हा अमली पदार्थ श्रीरापुर पोलिसांनी 2025 मध्ये कारवाई करून जप्त केलेला होता.
गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार पदावर कार्यरत होता. तो मुद्देमाल कारकून म्हणून काम पाहत होता. त्यामुळे त्याला कोणत्या कारवाईत किती अमली पदार्थ जप्त केले याची माहिती होती. त्याच संधीचा फायदा घेत त्याने हे कृत्य केल्याची माहीती आहे.
गुजर याने मुद्देमाल कक्षातून अल्प्राझोलम हा अमली पदार्थ बाहेर काढताना आपली चोरी पकडू नये म्हणून त्या ठिकाणी अमली पदार्थासारखा दिसणारा दुसरा तत्सम पदार्थ ठेवल्याचे पुणे ग्रामिण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी उपस्थित होते.
याप्रकरणी, आत्तापर्यंत पोलिसांनी पोलिस हवालदार गुजर याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. शादाब रियाज शेख (वय.41,रा.डंबेनाला, शिरुर),ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे (वय.37), ऋषीकेश प्रकाश चित्तर (वय.35,रा.कुरूंद,ता.पारनेर),महेश दादाभाऊ गायकवाड (वय.37,रा.हिंगणी, ता.श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. आरोपींच्या विरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना गिल्ल यांनी सांगितले, 17 जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक गिल्ल यांना माहिती मिळाली होती, शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाची देवान घेवान होणार आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून गॅरेज चालक शादाब शेख याला ताब्यात घेतले.
पोलिस हवालदार गुजर हा मागील दोन तीन वर्षापासून चित्तर याला ओळखतो. त्याने हे अमली पदार्थ चित्तर याला दिले होते. पुढे गायकवाड आणि शिंदेच्या मार्फत हे अमली पदार्थ शादाब शेख याच्याकडे पोहचले. जेव्हा पोलिसांनी शादाबला अटक केली तेव्हा त्याने पोलिस हवालदार गुजर आणि इतरांची नावे सांगितली.
पोलिसांना शिरुर येथे शादाब याच्या ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम अमली अल्प्राझोलम हा अमली पदार्थ मिळून आला होता. गुजर आणि इतरांच्या चौकशीत पोलिसांना समजले की गुजर याने 10 किलो 707 ग्रॅम वजनाचे अल्प्राझोलम मुद्देमाल कक्षातून बाहेर काढले होते. पोलिसांनी सर्व अमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुणे ग्रामिण पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांना याबाबत पत्रव्यवहार केला असून, आरोपी गुजर याने यापुर्वी देखीप्रकारे आणखी काही अमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून गैरप्रकारे बाहेर काढले आहेत का याची चौकशी करण्यास सांगितले आहे.
याप्रकरणी, पोलिस हवालदारासह आत्तापर्यंत पाच जणांना पुणे ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 किलो 707 ग्रॅम वजनाचा अल्प्राझोलम नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 25 ते 30 कोटी अंदाजे आहे.संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामिण
कोण आहे पोलिस हवालदार गुजर
2008 मध्ये अहिल्यानगर पोलिस दलात भरती. प्रशिक्षण कालावधीनंतर पहिली नेमणूक पारनेर पोलिस ठाण्यात. तेथे मुद्देमाल कारकूनची जबाबदारी. त्यानंतर पारनेर पोलिस ठाण्यातून बदली झाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात नेमणूक. तेथे काही दिवस काम केल्यानंतर त्याला अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्याच्यावर परत मुद्देमाल कारकूनची जबाबदारी देण्यात आली.त्यानंतर त्याचा थेट मुद्देमाल कक्षातील अमली पदार्थ चोरी करून विक्री करण्याचा कारनामा समोर आला.