पुणे: विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूकांडानंतर पुणे पोलिसांनी अवैध मद्यव्यवसायाविरोधात कडक भूमिका घेत व्यापक ॲक्शन प्लॅन जाहीर केला आहे. शहरात कुठेही अवैध दारू आढळल्यास तिचा उगम शोधून संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त केली जाईल. दारू कोणत्याही पोलिस ठाण्याच्या किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून आली असली तरी संबंधित ठिकाणी जाऊन थेट कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत अवैध दारूची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता पुरवठादार, वाहतूकदार आणि संपूर्ण नेटवर्कवर पोलिसांचा फोकस असणार आहे.
पुणे शहरात येणाऱ्या अवैध दारूचा मोठा पुरवठा ग््राामीण भागातून होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दारू जप्त होईल, तेथून तिचा माग काढत मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध मद्यवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची माहिती आरटीओ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागविण्यात आली आहे.
दरम्यान, अवैध दारूविरोधातील कारवाईची व्याप्ती वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 2021 मध्ये 988, 2022 मध्ये 690, 2023 मध्ये 1,451, 2024 मध्ये 1,716 आणि 2025 मध्ये 1,786 वाहने जप्त करण्यात आली होती. यंदा अवघ्या पाच महिन्यांतच एक हजार वाहनांवर कारवाई झाली आहे.
अवैध मद्यव्यवसायाला आळा घालण्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग््राामीण पोलिस यांच्यात संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असून, माहितीची देवाणघेवाण आणि समन्वित कारवाईद्वारे दारूमाफियांविरोधात निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.