Pudhari File Photo
पुणे

Pune PMP Bus | पीएमपी बस चालकांनो सावधान...!

वाहतूक नियम मोडल्यास आता खैर नाही; थेट निलंबनाची कारवाई आणि 2 हजार रुपये दंड...

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पीएमपीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे जर पीएमपी बस चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांना थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक चालक आणि बसच्या वाहकाकडून तब्बल दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. पीएमपी प्रशासनाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये पीएमपी बस चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. अनेकदा बस थांब्यावर बस न थांबवणे, अचानक वेगात बदल करणे, चुकीच्या दिशेने वळण घेणे, लेनचे उल्लंघन करणे यांसारख्या घटनांमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकानुसार, आता कोणत्याही चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला पहिल्या वेळेस दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांवर मात्र, थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की, स्वमालकीच्या व खासगी बस पुरवठादारांच्या बसवरील चालक-वाहक सेवक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रवासी नागरिक, सजग नागरिक मंच, पीएमपीएमएल प्रवासी मंच तसेच सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी व सुचना प्राप्त होत असतात. या तक्रारी व सूचनांमध्ये प्रामुख्याने बस चालविताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्रल तोडणे यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे. मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण होणाच्या दृष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास चालक-वाहक सेवकांवर २ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहेत.

चालक वाहकांना दिल्यात या सक्त सूचना....

१) बस चालविताना चालकाने मोबाईलवर बोलू नये. 

२) वाहतुकीच्या नियमांचे पालन करून बस चालविणे. 

३) चालक-वाहक सेवकाने कोणत्याही प्रकारचे धुम्रपान करू नये. 

४) प्रवाशांना चढ-उतार करणे सुलभ होईल अशा रीतीने बस  बस थांब्यालगत उभी करणे. 

५) लेनच्या शिस्तीचे पालन करणे. 

६) भरधाव वेगाने बस चालवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT