PMPML Bus Pudhari
पुणे

Pune PMPML New Buses: पुणेकरांसाठी वर्षभरात २,५०० नव्या पीएमपी बस; डेपोंच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश

मार्चअखेरपर्यंत एक हजार बस दाखल होणार; विद्युत पुरवठा, डांबरीकरण आणि सीमाभिंतींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांचा सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात पुढील वर्षभरात नव्या २,५०० बस दाखल होणार आहेत. मात्र, वाढणाऱ्या बससंख्येच्या तुलनेत डेपोंमधील पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याने या सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. बस डेपोंमध्ये विद्युत पुरवठा, डांबरीकरण, सीमा भिंतींची उभारणी यांसह आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

महापालिकेत सोमवारी (दि. १९) आयुक्त नवल किशोर राम, पीएमपीएमएलचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीएमपीएमएलच्या डेपोंमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी वरील सूचना आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या.

शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १,९०० बस असून, दररोज ११ ते १२ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. मात्र, नादुरुस्त आणि अपुऱ्या बससंख्येमुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर नव्या बस समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पीएमपीसाठी एक हजार सीएनजी बस खरेदी करण्याकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ५०० कोटी रुपये, पुणे महापालिकेकडून १५० कोटी रुपये आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १०० कोटी रुपये, असा एकूण ७५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या ई-ड्राइव्ह योजनेतून आणखी एक हजार सीएनजी बस पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात मोठी वाढ होणार आहे.

पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज

एकीकडे बससंख्या वाढविण्याचे नियोजन सुरू असताना दुसरीकडे पीएमपीच्या बस डेपोंमध्ये मात्र अनेक अडचणी आहेत. बसच्या दुरुस्तीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडथळे येतात. तसेच, रात्रीच्या वेळी काही बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. नव्या बस दाखल झाल्यानंतर या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने डेपोंमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले, की मार्चअखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बस दाखल होतील, तर पुढील वर्षभरात आणखी दीड हजार बस उपलब्ध होतील. या बस दाखल होण्यापूर्वी डेपोंमधील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था सुधारणे, डेपोंमध्ये डांबरीकरण करणे आणि सीमा भिंती बांधणे यांसारखी कामे करावी लागणार आहेत. नव्या बसच्या संचलनात अडचणी येऊ नयेत, यासाठी ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT