PMC Pudhari
पुणे

Pune Politics: बालवडकरांच्या ठरावावरील सही भोवली! सुहास टिंगरेंचा १२ कोटींचा विकास निधी वळवला; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

'राजकीय राग काढा, जनतेच्या विकासावर घाला का?' सुहास टिंगरे यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केल्याचा राग राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांच्या प्रभागावर काढण्यात आला आहे.

भाजपने प्रभाग क्रमांक २ 'ड'साठी नियोजित केलेला १२ कोटी रुपयांचा विकास निधी प्रभाग क्रमांक ३ मधील कामांसाठी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीत वळवला. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी या घटनेचा निषेध करत या निर्णयाविरोधात संविधानिक मार्गाने लढा देण्याचा इशारा दिला.

महापालिकेच्या साप्ताहिक स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या दोन सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाद्वारे हा निधी वर्ग करण्यात आल्याचे सुहास टिंगरे यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भातील कामांची चौकशी करण्याचा ठराव मांडला होता.

या ठरावाला अनुमोदक म्हणून आपण स्वाक्षरी केली होती. त्याच राजकीय वैमनस्यातून आणि सूडभावनेतून प्रभागाचा निधी पळवल्याचा आरोप टिंगरे यांनी केला. 'संसदीय लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक हे परस्परांना पूरक असतात; शत्रू नसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मत मांडण्याचा अधिकार दिला आहे.

'माझ्यावर राजकीय राग काढायचा असेल तर राजकारणात काढा; जनतेच्या विकासावर घाला का घालता?' असा सवाल त्यांनी केला. प्रभागातील नागरिक व मुलांसाठी ड्रेनेजलाइन, जलतरण तलाव, क्रीडांगणे आणि रस्त्यांची कामे प्रस्तावित होती.

हा पैसा जनतेच्या करातून जमा झालेला असून, कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची जहागीर नाही, असे टिंगरे म्हणाले. या निर्णयाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते, शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिडकरांनी मांडली भूमिका

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून राज्यातील आणि शहरातील भाजपच्या नेतृत्वावर सातत्याने टीका केली जात असून, मुख्य सभेच्या कामकाजातही अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बिडकर यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या 'तिरंगा रॅली'वर, तसेच मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

तसेच, बालवडकर आणि नगरसेवक सुहास टिंगरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील आमदार निधीतून झालेल्या कामांच्या चौकशीचा ठराव स्थायी समितीत मांडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी आणि सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार वस्तुस्थितीला धरून नसल्याचे बिडकर यांनी आकडेवारीसह स्पष्ट केलेे. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत भाजपच्या १२६ सभासदांना ११६० मिनिटे, तर राष्ट्रवादीच्या २७ सभासदांना ५०६ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली.

म्हणजेच, भाजपच्या नगरसेवकाला सरासरी नऊ मिनिटे, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला १८ मिनिटे वेळ मिळाल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, १८ ऑगस्टच्या मुख्य सभेत नियमाप्रमाणे विषय दाखल करून घेण्यास बालवडकर यांनी विरोध केल्याचा आरोपही बिडकर यांनी केला असून, त्यांच्या भूमिकेमुळे सभागृहाच्या कामकाजात बाधा आली. बालवडकर आणि टिंगरे यांना स्थायी समितीच्या माध्यमातून दिलेला निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करण्याचा निर्णय घेतल्याचे बिडकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT