PMPML Pudhari
पुणे

Pune PMPML Bus Frequency: पुणे-पिंपरीत बससेवेची वारंवारता घटली; ५ मिनिटांनी बस मिळणाऱ्या नागरिकांचे प्रमाण २१ टक्क्यांवर

२०१९ मध्ये हे प्रमाण होते ६६ टक्के; मार्गांचे पुनर्नियोजन केल्यास ६१ टक्क्यांपर्यंत सुधारणा शक्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांच्या बसच्या वारंवारतेचा अभ्यास केल्यास दोन्ही शहरांमधील फक्त २१ टक्के नागरिकांनाच दर ५ मिनिटांच्या अंतरावर बससेवा उपलब्ध होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

पीएमपीएमएल आणि आयटीडीपी इंडिया यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या ‌'पीपल निअर ट्रान्झिन्स्ट २०२६' (पीएनटी) या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नुकतेच या अहवालाचे प्रकाशन महापौर मंजूषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापक महेश आव्हाड, पीएमपी संचालक तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या हस्ते झाले.

आयटीडीपी संस्थेचे उपव्यवस्थापक आदित्य राणे यांच्या मते, सध्या १० ते २० मिनिटांच्या अंतराने चालणाऱ्या मार्गांचे पुनर्नियोजन केल्यास हे प्रमाण २१ टक्क्यांवरून ६१ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी अहवालातील निष्कर्षाबाबत सांगितले की, आयटीडीपीच्या पीएनटी अभ्यासातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची स्पष्ट संधी दिसून येते. बस ताफ्यात वाढ, मार्गांचे पुनर्नियोजन, बसची वारंवारता वाढवणे, बसथांब्यांवरील सुविधा सुधारणे, पादचारी जोडणी मजबूत करणे तसेच मेट्रो आणि पीएमपीसोबत अधिक चांगले एकत्रीकरण या उपायांमधून ही सुधारणा शक्य आहे.

सार्वजनिक वाहतूक अपुरी असलेले १६ भाग

अभ्यासानुसार, दोन्ही शहरांत उच्च लोकसंख्या घनता (प्रति चौ. किमी. ५० हजारपर्यंत) असूनही पुरेशी वारंवार बससेवा नसलेले १६ भाग ओळखण्यात आले आहेत. यात पुण्यातील बाणेर, धानोरी, धावडी, हांडेवाडी, कोंढवा, कोथरूड, आंबेगाव आणि वडगाव शेरी हे असून, पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी, भोसरी, चिखली, एमआयडीसी, रहाटणी, सांगवी, तळवडे आणि वाकड हे असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

वारंवारतेत घट

२०१९ मधील अभ्यासात दर ५ मिनिटांनी वारंवार बससेवा मिळणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण ६६ टक्के होते, जे आता घसरून २१ टक्यांवर आले. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार झाला, मात्र त्या प्रमाणात ताफ्यात बसची वाढ न झाल्याने ही तफावत निर्माण झाली आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार बस असून त्या ४५० हून अधिक मार्गांवर धावतात. त्या बस लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • २० टक्के रोजगाराच्या ठिकाणी दर ५ मिनिटांनी बस उपलब्ध

  • ३० टक्के शाळांजवळ दर ५ मिनिटांनी बस उपलब्ध

  • ३७ टक्के अधिसूचित झोपडपट्ट्यांजवळ दर ५ मिनिटांनी बस उपलब्ध.

  • ४७ टक्के बसथांबे सुरक्षित व सलग पदपथांनी जोडलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT