पुणे

पुणे-पिंपरी चिंचवड प्रवास होणार सुकर

अमृता चौगुले

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे 1 ऑगस्टपासून मेट्रोने जोडली जाणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा वनाज ते गरवारे मार्ग दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आला होता. सुरुवातीचे काही दिवस या मार्गावर पुणेकरांनी उत्सुकतेपोटी प्रवास केला. मात्र, त्यानंतर या मार्गाला अपेक्षित प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे मेट्रोसेवेचा पुढचा मार्ग सुरू करण्याची मागणी केली होती.

यानंतर महामेट्रोनेही मागील वर्षी आधी डिसेंबरमध्ये पुढचा मार्ग सुरू होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर वारंवार मुदत मागितली. प्रत्यक्षात मेट्रो कधी सुरू होणार, हे स्पष्ट नसल्याने विरोधकांकडून टीका होत होती. अखेर 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित सेवेचे उद्घाटन होत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएच्या कार्यक्रमांमध्ये मेट्रोचे हे मार्ग सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुणेकरांची मेट्रो मार्गाच्या विस्ताराची प्रतीक्षा दीड वर्षाने संपणार आहे. मेट्रोच्या विस्तारित सेवेत फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, गरवारे महाविद्यालय ते जिल्हा न्यायालय आणि जिल्हा न्यायालय ते रुबी हॉस्पिटल, या तीन मार्गांचा समावेश आहे. या सर्व मार्गांसाठी जिल्हा न्यायालय हे इंटरचेंज स्टेशन असेल. त्यामुळे पुणेकरांना आता वनाज ते थेट पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटलपासून पिंपरी-चिंचवड ते वनाजपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना दळणवळणाचा वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे.

सुरू होणारे मार्ग आणि अंतर (किमी)
फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय : 6.91
गरवारे महाविद्यालय ते जिल्हा न्यायालय : 2.38
जिल्हा न्यायालय ते रुबी हॉल क्लिनिक : 2.37

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT