Heatwave Pudhari
पुणे

Pune Heatwave 2026: पुणे-पिंपरीत उष्णतेचा कहर; तापमान 42 अंशांवर पोहोचले

तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण; दुपारी रस्ते ओस, डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा तीव झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे शहरात उकाडाही प्रचंड वाढला असून, दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. विशेषत: दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नागरिक तीव उन्हामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून, अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर न जाण्याला प्राधान्य देत आहेत. शहरातील बांधकाम मजूर, डिलिव्हरी कर्मचारी, वाहतूक कर्मचारी आणि अंगमेहनतीची कामे करणाऱ्या कामगारांना या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुपारच्या वेळी अनेक भागांमध्ये रस्ते ओस पडलेले दिसून आले.

नागरिकांकडून थंड पेये, उसाचा रस, ताक आणि फळांच्या रसाला मोठी मागणी वाढली आहे. तसेच बाजारपेठांमध्ये छत्री, टोपी आणि सनस्क्रीनचा वापरही वाढला आहे. पुणे शहराचे कमाल तापमान मागील तीन ते चार दिवसांपासून 41 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात होते. बुधवारी तापमानात किंचित घट होऊन ते 39 अंशांवर आले.

मात्र, उकाड्याची तीवता कायम असल्याने नागरिकांना फारसा दिलासा मिळालेला नाही. लोहगाव परिसरात तर तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला होता. बुधवारी त्यात काहीशी घट होऊन तापमान 41 अंशांवर नोंदवले गेले. पिंपरी-चिंचवड शहरातही अशीच परिस्थिती असून, दुपारच्या वेळेत प्रमुख चौक आणि रस्त्यांवर तुलनेने कमी गर्दी दिसून आली.

वाढत्या उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. पुरेसे पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि हलका आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस शहरांत संध्याकाळच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT