पुणे

पुणेकरांनो काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढतोय; हवामान शास्त्रज्ञांनी ‘या’ दिल्या टिप्स 

Laxman Dhenge
पुणे : गुजरातमधून उष्ण व दमट वारे येत असल्याने शहराच्या चारही बाजूंनी उष्णतेचा वणवा पेटला आहे. सरासरी तापमान 40 अंशांवर गेले आहे. भरदुपारी 3 वाजता पारा 42 अंशांवर जात आहे. उष्ण- दमट वातावरणामुळे पुणेकरांना उष्माघाताचा धोका आहे. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत सावधान… असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. देशात पाच राज्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. त्यातही मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा सर्वाधिक आहे. कारण सोलापूर, पुणे शहरातील बहुतांश भाग राज्यात अग्रेसर आहेत. गुजरात राज्यातून या उष्ण लहरी शहरात येत आहेत. त्यामुळे तापमान 39 ते 41 अंशांवर असले, तरी उष्ण लहरींचा कालावधी 4 ते 5 तासांचा आहे.

गेले 40 दिवस शहर धगधगतेय

गेले 40 दिवस शहराचा पारा सतत 38 ते 41 अंशांवर आहे. संपूर्ण मार्च महिन्यात शहरात
उष्णतेची लाट तीव्र होती. त्या 31 दिवसांत शहरात एकदाही पाऊस पडला नाही, तर एप्रिलमध्येही ही लाट तीव्र झाली असून, कमाल तापमानासह उष्ण लहरी तीव्र झाल्याने उष्माघाताचा धोका गेल्या दोन आठवड्यापासून शहरात जाणवत आहे. कमाल तापमानातील वाढ ही बाब शहरासाठी नवी नाही. मात्र, उष्ण लहरीचा कालावधी वाढला आहे. गुजरातमधून या लहरी शहरात येत आहेत.

आर्द्रता वाढल्याने उष्माघाताचा धोका

अरबी समुद्रातून गुजरातकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. तेच पुणे शहराकडे येत आहेत त्यामुळे उष्ण व दमट वातावरण शहरात तयार झाल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 बाहेर जाणे टाळावे, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी दिल्या टिप्स

  • सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर जाणे टाळा, लहान मुले,ज्येष्ठ नागरिकांना या काळात जपा
  • बाहेर जावेच लागले तर उन्हात खूप वेळ प्रवास करू नका. थांबत थांबत प्रवास करा
  • सतत पाणी, सरबत यांचे सेवन करा
  • सुती कपडे,गॉगल,हेल्मेट,सनकोट घालून बाहेर पडा. मात्र, सावलीत येताच मोकळी हवा घ्या, शरीर गार करा
  • अशा वातावरणात शरीरातील पाणी कमी होऊन हात-पाय आखडतात, नंतर हिट स्ट्रोकचे रूपांतर हृदयविकारात होऊ शकते.
  • सभा, मिरवणुकांना जाताना काळजी घ्या.सलग एक तास उन्हात फिरूरु नका. फिरलात तर तत्काळ शरीर थंड करा.
अरबी समुद्राकडून गुजरात राज्यात उष्ण व दमट वारे वाहत आहेत. हेच वारे तिकडून महाराष्ट्रात येत आहे. याचा प्रभाव पुणे शहरावरही होत आहे.कमाल तापमानाचा पारा नेहमी एप्रिलमध्ये पुण्यात 40 अंशांवर असतोच पण उष्ण व दमट वारे नसतात. यंदा त्यांचा मुक्काम शहरात सतत आहे.गेल्या दोन आठवड्यांत तो प्रभाव जास्त वाढल्याने अशा वातावरणात उष्माघात होण्याचा धोका असतो.अशावेळी शरीर थंड ठेवणे गरजेचे आहे.
अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT