Parking Pudhari
पुणे

Pune Pay and Park: पुण्यात ‘पे अँड पार्क’ला वेग! लक्ष्मी रस्ता, विमाननगरसह ६ रस्त्यांवर योजना

बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेचा पुढाकार; १.७७ कोटींची निविदा स्थायी समितीसमोर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरणाऱ्या बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या 'पे अँड पार्क' योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली ही योजना शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता आणि विमानतळ रस्त्यावर लागू करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकले आहे. यासंदर्भातील निविदा प्रकल्प विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २०१८ मध्ये शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर 'नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग' तसेच काही मर्यादित भागांमध्ये 'पे अँड पार्क' करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या वेळी सत्ताधारी भाजप वगळता अन्य पक्षांनी या निर्णयाला विरोध केल्याने योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवला; परंतु त्यावर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, सर्वसाधारण सभेने यापूर्वीच या योजनेला मान्यता दिलेली असल्याने पालिका प्रशासनाने आता त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

६ रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर योजना

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे प्रयत्न सुरू आहेत. प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासह वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने हटवण्यासाठी 'पे अँड पार्क' योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर 'पे अँड पार्क'ची निविदा काढली. यामध्ये जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर या रस्त्यांचा समावेश आहे. या निविदेला सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता आणि विमाननगर रस्त्यासाठी प्रत्येकी एका ठेकेदाराने निविदा भरली. मात्र लक्ष्मी रस्त्यासह बालेवाडी हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी रस्त्यासाठी एकही निविदा दाखल झाली नाही. एकच निविदा प्राप्त झाल्यास फेरनिविदा काढणे बंधनकारक आहे. तसेच, ज्या ठिकाणी एकही निविदा आली नाही, त्या ठिकाणीही फेरनिविदा काढावी लागते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या सर्व ठिकाणांसाठी फेरनिविदा प्रक्रिया राबवली.

दोन कोटींची निविदा; १.७७ कोटींची बोली

'पे अँड पार्क' योजनेसाठी महापालिकेने दोन कोटी ९२ लाख ६१ हजार ९०४ रुपयांची निविदा काढली होती. त्यापेक्षा कमी दराने म्हणजेच एक कोटी ७७ लाख ३५ हजार ६४० रुपयांची निविदा प्राप्त झाली आहे. प्रकल्प विभागाने ही निविदा आता स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केली आहे. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदेला मंजुरी मिळाल्यास १८ तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावर पहिला टप्पा

प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्याची निवड केली आहे. लक्ष्मी रस्त्यावर दुकानदार तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने ग्राहकांसाठी पार्किंगची जागा अत्यल्प उरते. त्यातच अनेक चारचाकी वाहनचालक तसेच रिक्षाचालक दुचाकींच्या शेजारी वाहने उभी करून त्यामध्येच बसून राहतात. त्यामुळे रस्त्याची एक बाजू मोठ्या प्रमाणात अडली जाते. परिणामी, या भागातील वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT