पुणे: दूषित पाण्यामुळे पाषाण तलावातील माशांच्या मृत्युप्रकरणी महापालिकेने कडक कारवाई करत चार अधिकाऱ्यांना थेट निलंबित केले आहे, तर मुख्य अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात जोरदार खळबळ माजली आहे.
महापालिकेच्या मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू तसेच औंध बाणेर विभागाचे आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या काही दिवसात पाषाण तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत अवस्थेत आढळले होते. आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी या तलावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून माशांच्या मृत्यू नक्की कशामुळे होत आहे, याची माहिती घेतली होती. महापालिकेच्या प्राथमिक तपासात तलावालगत उभारलेले एक एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) व्यवस्थित कार्यरत नसल्याचे समोर आले. या केंद्रातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्याने जलजीवनावर गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्त राम यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, आयुक्तांनी पाषाण तलाव पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आढळला. या पार्श्वभूमीवर औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य निरीक्षक भोईर आणि चोपडे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ 2 चे उपआयुक्त संतोष वारुळे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, निलंबन काळात परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पाषाण तलाव हा शहरातील महत्त्वाचा पर्यावरणीय वारसा मानला जातो. या प्रकरणी मनपाने केलेल्या दुहेरी कारवाईमुळे संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली असून, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.