Pune Parvati Maratha History Pudhari
पुणे

Pune Parvati Maratha History: पर्वतीवर मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास; बाजीराव पेशव्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आकर्षण

देवदेवेश्वर संस्थानचा उपक्रम; सहा म्युरल आणि चार स्तंभांतून सातवाहन काळापासून आधुनिक भारताची प्रगती साकार

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने पर्वतीवर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास नव्या रूपात साकारण्यात आला आहे. सातवाहन कालखंड, देवगिरीवरील कृष्णदेवराय यांचे राज्य, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ते आजपर्यंतची झालेली देशाची प्रगती. अशा अनेक शतकांचा इतिहास या ठिकाणी चार स्तंभ आणि सहा म्युरलच्या माध्यमातून साकारला आहे. पर्वतीवरच्या विष्णू मंदिराच्या जवळच पहिले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा लक्षवेधी आहे.

पर्वती टेकडी ही पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहे. इसवी 23 एप्रिल 1749 मध्ये नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर (महादेवाचे) मंदिर बांधले. येथील पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले. समुद्रसपाटीपासून सुमारे 640 मीटर उंचीवर असलेली ही टेकडी धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्‌‍या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परिसरात देवदेवेश्वर, विष्णू, कार्तिकेय, विठ्ठल-रुख्मिणी अशी मंदिरे आहेत. या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांचे स्मारक आणि भव्य संग््राहालयदेखील आहे. त्यासमोरच नानासाहेब पेशवे यांचा अर्धाकृती पुतळा नुकताच बसवला आहे. त्यामागे विष्णू मंदिराच्या जवळ मराठा सामाज्याचा इतिहास नव्या रूपात साकारला आहे.

सुमारे बारा फूट उंच अन्‌‍ अडीच टन वजनाचा बाँझ धातूचा भव्य पुतळा बाजीराव पेशवे यांची समाधी असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूरपासून जवळच नर्मदेकाठी रावेरखेडी या ठिकाणासाठी तयार केला होता. मात्र, तेथे दलदलीची जागा असल्याने तेथे तो बसू शकला नाही. त्यानंतर डॉ. गरवारे यांनी हा पुतळा देवदेवेश्वर संस्थानला दिला. हा पुतळा पर्वतीवर आणणे कठीण काम होते. टेकडीच्या मागच्या बाजूने तो दोन भव्य क्रेनच्या साहाय्याने तो आणला गेला. अशी माहिती या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे गरवारे कंपनीचे निवृत्त अधिकारी सुनील सुतवणे यांनी दिली.

इतिहास सांगणारे म्युरल...

गत पाच ते सहा वर्षांपासून पर्वतीवर हे काम सुरू होते ते आता पूर्णत्वाकडे जात आहे. पर्वतीच्या 104 पायऱ्या चढून गेलात की, विठ्ठल मंदिराच्या डावीकडून नानासाहेब पेशव्यांच्या चिरविश्रांतीस्थानाकडे जाण्याच्या मार्गावर दोन तोफा तुमचे स्वागत करतात. दुतर्फा सहा म्युरल तुम्हाला इतिहास सांगू लागतात. सोनेरी रंगात तयार केलेली ही म्युरल पुणे ते दिल्ली आणि अटक ते कटक असा मराठा सामाज्याचा विस्तार कसा झाला ते सांगतात. पानिपतच्या पराभवाचा बदला आणि दिल्ली विजय याची सुंदर विलोभनीय क्षणचित्रे साकारली आहेत. यात शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज ते संपूर्ण पेशवेकाळ, मराठ्यांचे थोरसेनानी महादजी शिंदे यांनी दिल्ली जिंकून दिल्यावर शनिवारवाड्यात येताच त्यांच्यावर सोने आणि चांदीच्या फुलांचा झालेला वर्षाव, भारताची वैभवस्थाने यात अजिंठा, वेरुळ लेणी पैठणचा सातवाहनकाळ तेथील तीर्थस्तंभ, उत्तर भारतातील लढाया हे म्युरलमधून प्रकट केलेले आहे.

ही म्युरल बघून पुढे गेलात की, समोरच दिसतो तो पहिल्या बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा. त्याच्या चोहोबाजूला असलेल्या चार स्तंभांवर भारताच्या प्रगतीचा इतिहास कोरला आहे. पैठणच्या सातवाहन काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पेशवेकाळ असा खूप मोठा कालखंड, त्यातील लढाईचे क्षण आणि भारताची अलीकडच्या काळातील प्रगती. यात जुने व नवे संसद भवन, सैन्यदलातील चिन्हे, ध्वज असे अनेक बारकावे पाहावयास मिळतात. सामान्य नागरिकांसह इतिहासप्रेमी अन्‌‍ जिज्ञासूंसाठी हा मोठा ठेवा तयार झाला असून, नव्या पिढीला काही मिनिटांत इतिहासाची माहिती मिळेल, अशी रचना केली आहे.

यांनी घेतला पुढाकार...

  • सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या निधीतून हे काम सुरू आहे.

  • बाजीरावांचा भव्य पुतळा हा उद्योजक डॉ. शशिकांत गरवारे यांनी दिला, तसेच या कामी इतिहासप्रेमींनी देखील योगदान दिले.

  • म्युरल, खांब आणि नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मुलगे विपूल आणि विराज खटावकर यांनी केले आहे.

  • बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा पुण्यातील शिल्पकार संजय परदेशी

  • यांनी केला आहे. या ठिकाणी असलेल्या भव्य संग््राहालयाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

  • मराठा सामाज्याचा इतिहास या ठिकाणी सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पद्धतीने मांडण्यात येणार आहे.

  • डेक्कन कॉलेजमधील प्रा. सचिन जोशी यांच्या मदतीने संपूर्ण इतिहास लिहला जात असून, तो क्यूआर कोडच्या साह्याने जिज्ञासूंना डाऊनलोड करता येणार आहे.

  • हा सर्व इतिहास ‌‘एआय‌’च्या साहाय्याने 10 मिनिटे, 20 मिनिटे आणि दीड तास अशा स्वरूपात ऑडिओ माध्यमातूनही ऐकता येईल, अशी सुविधा तयार केली जात आहे.

  • येथील पुरातन अशा भव्य विष्णू मंदिरावरील जुने 125 कळस खराब झाले होते. ते पुन्हा नव्याने बसवण्याचे काम सुरू झाले आहे. एकूणच संपूर्ण पर्वती आता नव्या रूपात तयार होताना दिसत आहे.

गत चार ते पाच वर्षांपासून हे काम सुरू होते. ते आता पूर्णत्वाकडे जात आहे. अजून त्या भागात कारंज्यांचे काम बाकी आहे. आम्ही या ठिकाणी सातवाहन काळ, यादव घराणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे छत्रपती शाहू महाराज, मराठ्यांचे सेनानी महादजी शिंदे, पेशव्यांनी पुढे धुरा कशी सांभाळली, असा शेकडो वर्षांचा मराठा सामाज्याचा जाज्वल्य इतिहास आणि आत्ताची प्रगती ज्यात संसद भवन, सैन्यदलाची ताकद ही सर्व दृष्ये साकारण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या पिढीसाठी त्या ठिकाणी ऑडिओ स्वरूपात ती ऐकता येईल, अशी व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
रमेश भागवत, अध्यक्ष, देवदेवेश्वर संस्थान, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT