

ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) हद्दीतील गाढवे पटात बिबट्याचा दिवसा संचार होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप बबन गाढवे यांच्या शेतातील गहू व कांद्याच्या पिकामध्ये बिबट्या मुक्तपणे फिरताना अनेकांना दिसल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली असून दीपक गाढवे या शेतकऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अचानक बिबट्या दिसून आला. काही शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित अंतरावरून मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ परिसरात वेगाने व्हायरल होत असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाढवे पट भागात दाट लोकवस्ती आहे,आता बिबट्या दिवसाही वस्तीच्या जवळ दिसत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. विशेषतः लहान मुले व जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
परिसरात दाट उस, गहू व कांद्याची शेती असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे तसेच ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी एकटे शेतात न जाणे, लहान मुलांना बाहेर सोडू नये व रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.