निनाद देशमुख
पावती न देता जास्तीची शुल्कवसुली
महापालिकेच्या वाहनतळांवर ठेकेदारांकडून लूट
पुणे : शहरातील वाढती वाहने आणि त्यानुसार वाढलेली वाहनतळांची गरज लक्षात घेता महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी वाहनतळ उभारले. मात्र, या वाहनतळांवरील अनियमित कारभारामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. वाहनतळचालकांकडून मनमानी रक्कम वसूल केली जात असून, काही ठिकाणी पावत्या न देता पैसे घेतले जात आहेत. शहरातील ही वाहनतळ लुटीचे अड्डे बनले आहेत. काही वाहनतळांवर तर महिनोन् महिने वाहने धूळ खात पडलेली असून, याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत उघड झाले आहे. (Pune News Update)
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी गाड्या लावण्यासाठी वाहनतळ बांधण्यात आले आहेत. शहरात 30 पेक्षा अधिक वाहनतळ महापालिकेमार्फत बांधण्यात आले आहेत. हे वाहनतळ चालवण्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदारांना नेमले असून, त्यांच्याकडून महापालिकेला मोठे उत्पन्नदेखील मिळते. मात्र, हे ठेकेदार पालिकेचीच लूट करीत असल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे. वाहनतळात गाडी उभी करण्यासाठी दुचाकीला प्रतितास तीन रुपये, तर चारचाकीसाठी 14 रुपये इतके शुल्क आकारले जाते. खासगी वाहनतळापेक्षा महापालिकेच्या वाहनतळाचे दर कमी आहेत.
यामुळे नागरिक या ठिकाणी पैसे देऊन वाहन लावण्यास पसंती देतात. मात्र, हे वाहनतळ चालवणारे ठेकेदार नागरिकांची लूट करीत आहेत. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीचे
दर त्यांच्याकडून वसूल केले जातात. काही ठिकाणी तर नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना पावत्याच दिल्या जात नाहीत. या वाहनतळात महिन्याचा पास देऊन वाहने लावण्यास परवानगी दिली जाते. याबाबत पालिकेकडे चौकशी केल्यास या ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याचे समोर आले.
लक्ष्मी रस्ता भागातील वाहनतळ हे येथे खरेदी करण्यासाठी येणार्या नागरिकांना त्यांची वाहने पार्क करता यावी, या हेतूने बांधण्यात आले आहे. मात्र, आजूबाजूचे नागरिक महिन्याचा पास घेऊन जणू काही आपल्याच सोसायटीचे पार्किंग असल्यासारखा वाहनतळाचा वापर करत आहेत. अनेक दिवस गाड्या उभ्या केल्या जात असल्याने अशा अनेक गाड्यांनी सामान्य पुणेकरांची जागा अडवली जात असल्याचे पाहणीत आढळले.
महापालिकेच्या वाहनतळांवर दरपत्रक नाही
पावत्या न देता नागरिकांकडून पैशांची वसुली
सोयी-सुविधांचा अभाव अनेक वाहने धूळ खात
ठेकेदारांच्या कर्मचार्यांकडून उर्मट वागणूक
तळीरामांचा वाहनतळ परिसरात वावर
वाहनतळांचा खासगी मालमत्तेप्रमाणे वापर
दरपत्रकात मोठी तफावत
महानगरपालिकेने शहरात 30 पेक्षा जास्त वाहनतळ उभारले आहेत. या वाहनतळांतून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. 4 कोटी 34 लाख 39 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना गेल्या काही वर्षांत 1 कोटी 16 लाख 93 हजार रुपयांचे उत्पन्न महानगरपालिकेला मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यांत 46 लाख 35 हजार रुपयांची थकबाकी या वाहनतळचालक ठेकेदारांकडे आहे.