Parking Pudhari
पुणे

Pune Parking Charges: पुण्यात पार्किंगच्या नावाखाली ‘खिसेकापू’ कारभार!; मॉल-मल्टिप्लेक्समध्ये ३०० रुपयांपर्यंत वसुली

सार्वजनिक वाहनतळांवरही ठेकेदारांची मनमानी; खासगी पार्किंग शुल्काला चाप लावण्याची महापालिका सभेत मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांच्या करातून महापालिकेने उभारलेल्या सार्वजनिक वाहनतळांवर ठेकेदारांकडून मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी असतानाच मॉल, मल्टिप्लेक्समधील खासगी पार्किंगच्या नावाखालीही नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी केला. काही ठिकाणी वाहन पार्किंगसाठी तब्बल २०० ते ३०० रुपये आकारले जात असल्याने या अवाजवी शुल्काला तातडीने चाप लावण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत कोट्यवधी रुपये खर्चून वाहनतळ उभारले आहेत. निविदा प्रक्रियेतून हे वाहनतळ ठेकेदारांना चालविण्यास दिले जातात आणि त्यासाठी शुल्कही निश्चित केले जाते. मात्र, ठरलेल्या दरांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप या वेळी नगरसेवकांनी केला.

दरम्यान, मॉल आणि मल्टिप्लेक्समधील पार्किंगचा प्रश्न नगरसेवक रवी टिंगरे आणि विशाल मलके यांनी सभागृहात उपस्थित केला. काही तासांच्या पार्किंगसाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागत असल्याने खरेदी किंवा मनोरंजनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. खासगी वाहनतळांच्या शुल्कावर महापालिकेचे प्रभावी नियंत्रण नसल्याबद्दलही प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

सार्वजनिक रस्त्यांवरील पार्किंगची सुविधा अपुरी ठेवायची आणि नागरिकांना खासगी वाहनतळांचा वापर करण्यास भाग पाडायचे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनतळ ही नागरिकांची सुविधा न राहता काहींसाठी कमाईचे साधन बनल्याची टीका नगरसेवकांनी केली. सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही वाहनतळांच्या शुल्काबाबत स्पष्ट धोरण आणि कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेचे २०१८ मधील पार्किंग धोरण बदलून नव्याने धोरण तयार केले जात आहे. त्यामध्ये खासगी वाहनतळांच्या अवाजवी शुल्कावर निर्बंध आणण्यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात येत असून, मॉल, मल्टिप्लेक्ससह अन्य खासगी आस्थापनांच्या पार्किंग दरांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

पार्किंगच्या नावाखाली ‘खिसेकापू’ कारभार!

  • मॉल, मल्टिप्लेक्समध्ये काही तासांच्या पार्किंगसाठी २०० ते ३०० रुपये आकारल्याचा आरोप

  • सार्वजनिक वाहनतळांवरही ठेकेदारांकडून मनमानी शुल्क वसुलीच्या तक्रारी

  • खासगी वाहनतळांच्या दरांवर महापालिकेचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा नगरसेवकांचा आरोप

  • नव्या पार्किंग धोरणातून खासगी वाहनतळांच्या शुल्काला निर्बंध आणण्याची तयारी

महापालिकेने २०१८ मध्ये पार्किंग धोरण तयार केले होते. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात आवश्यक सुधारणा करून नवीन धोरण तयार केले जात आहे. खासगी वाहनतळांवरील मनमानी शुल्काला आळा घालण्यासाठी त्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मॉल, मल्टिप्लेक्स आणि अन्य खासगी आस्थापनांच्या पार्किंग दरांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न आहे.
दिनकर गोजारे, प्रमुख, प्रकल्प विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT