Water Supply Pudhari
पुणे

Pune Palkhi Water Cut: पालखी सोहळ्यासाठी पुण्यात 9 व 10 जुलैची पाणीकपात रद्द; वारकऱ्यांसाठी महापालिकेचा मोठा निर्णय

लाखो वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय; 'सेवा वारी' उपक्रमासह महिला वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दि. ९ आणि १० जुलै रोजी पुणे शहरातील नियोजित पाणीकपात रद्द करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी राहणार असल्याने नागरिकांसह वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते. यावर्षी पाऊस लांबल्याने शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, या कपातीचा फटका वारकऱ्यांना बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे 'सेवा वारी' हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून, वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

महिला वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आवाहन

पालखी मुक्कामादरम्यान महिला वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती पेठांतील गृहनिर्माण संस्था, बैठी घरे, हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिकांनी आपली स्वच्छतागृहे महिला वारकऱ्यांसाठी खुली करावीत, असे आवाहन महापालिका करणार आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले की, हा उपक्रम यापूर्वी मर्यादित स्वरूपात राबवण्यात आला होता. मात्र, यंदा तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT