पुणे: हडपसर गाडीतळ परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या तब्बल १० महिला भाविकांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत छबुताई आप्पासो वाडकर (वय ५७, रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान हडपसर गाडीतळ येथे हा प्रकार घडला. फिर्यादी छबुताई आणि इतर ९ महिला भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी दर्शनासाठी आल्या होत्या. या वेळी दर्शनाच्या मुख्य रांगेतील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने फिर्यादी व इतर ९ महिलांच्या गळ्यातील एकूण तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचे ८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने चोरून नेले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महिलेचे सोन्याचे दागिने लंपास
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दर्शनादरम्यान उसळलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने महिला भाविकाचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना शेवाळेवाडीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत स्वाती चिंतामन ढमाळे (वय ५१, रा. शिवझेन वर्ल्ड सोसायटी, मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता शेवाळवाडीतील कुमार मिडोज चौकात ही घटना घडली. फिर्यादी या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेत होत्या.
या वेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
पालखी गर्दीत मोबाईल चोरणारे तीन चोरटे रंगेहाथ अटकेत
सोलापूर रस्त्यावरील शंकर मठाजवळ पालखी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंडच्या एका आरोपीसह पुण्याच्या दोन तरुणांना साध्या वेशातील पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तेजस राजेश गुंजाळ (रा. व्हीआयटी कॉलेजजवळ, अप्पर इंदिरानगर, पुणे), टिपेंद्र गुलाब म्हेत्रे (रा. हरकानगर, भवानी पेठ, पुणे) आणि शिवदर्शन जनार्दन महतो (रा. मु. पो. थाना तीनपहाड, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अविनाश गोविंद निळकंठ (वय ६०, रा. बंगला नं. २१, वायरलेस कॉलनी, मॅकडोनाल्डजवळ, औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. ११ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता सोलापूर रस्त्यावरील शंकर मठासमोरील रामनाथ फरसाण मार्ट समोर हा प्रकार घडला. फिर्यादी अविनाश निळकंठ हे पालखी दर्शनासाठी गेले असताना तिन्ही आरोपींनी संगनमत करून त्यांच्या पँटच्या पुढच्या खिशातून ४० हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन १३ मोबाईल काढून घेतला. आरोपी पळून जात असताना साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
पायी घरी जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरी
लोकमान्यनगर परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी घराकडे जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने पाठीमागून येऊन हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्मिता किशोर तलाठी (रा. रामकृष्ण मठाशेजारी, अनुबंध सोसायटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. १० जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता स्पॅरीटो पिझ्झा दुकानासमोर चौकामध्ये, लोकमान्यनगर, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी स्मिता तलाठी या पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने, फिर्यादीच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे एक लाख ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
पायी पालखी दर्शनाला जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरी
खडकी पाटील इस्टेट परिसरात पतीसोबत पायी चालत पालखी दर्शनासाठी जात असलेल्या एका महिलेची सोनसाखळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरून नेली.
याप्रकरणी अज्ञात आरोपीवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंगल संदेश पाटील (वय ४८, रा. द्वारका हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट नं. ४०१, जाधववाडी, चिखली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ११ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली.