Pune Palestine Protest Pudhari
पुणे

Pune Palestine Protest: पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन; २३ जणांविरुद्ध गुन्हा

डेक्‍कन पोलिसांची कारवाई: परवानगी नाकारली असतानाही केली निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पोलिसांकडून आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असताना देखील जंगली महाराज स्त्यावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या एका संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

जंगली महाराज रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात रविवारी (दि.15) सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास एका संघटनेकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करण्यासाठी संबंधित संघटनेकडून पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संंघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिस परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना डेक्कन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून सोडून दिले. याबाबत पोलिस हवालदार नलिन येरुणकर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संंबंधित संस्थेकडून आयाेजित केलेल्या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इस्राईलला भेट देणार आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले होते. मात्र, पोलिसांनी शांततामय मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनास परवानगी नाकारून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT