पुणे: शहरातील रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या ओव्हरहेड केबल्सच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले असले, तरी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याच्या अंमलबजावणीला विलंब होणार आहे. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील केबल्सचा त्रास आणि अपघातांचा धोका पुणेकरांना आणखी काही काळ सहन करावा लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांत महापालिकेने शहरातील रस्ते, चौक आणि पदपथांवर अस्ताव्यस्त लटकणाऱ्या ओव्हरहेड केबल्सविरोधात मोहीम हाती घेतली होती. शहराचे विद्रुपीकरण होत असल्याबरोबरच या केबल्समुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याचे कारण प्रशासनाने दिले होते. मात्र, केबल टीव्ही आणि बॉडबँड ऑपरेटर संघटनांनी या कारवाईला विरोध करत महापालिकेकडे स्पष्ट धोरण नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर नवीन धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कारवाई थांबविण्यात आली.
सध्या अनेक भागांत तुटलेल्या व कापलेल्या केबल्स खांबांवर, झाडांवर आणि रस्त्यांवर लटकताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते आणि पदपथांवरही ही समस्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एप्रिल महिन्यात पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे लटकत्या केबलमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही पुण्यात प्रभावी उपाययोजना होत नसल्याची टीका होत आहे.
रस्तेदुरुस्तीवरून खासगी कंपन्यांवर प्रश्नचिन्ह
शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी लागणारे खोदाई शुल्क टाळण्यासाठी अनेक कंपन्या ओव्हरहेड केबलचा पर्याय वापरत असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, भूमिगत केबलसाठी रस्ते खोदणाऱ्या कंपन्यांकडून शुल्क आणि बँक गॅरंटी घेतली जाते. मात्र, खोदाईनंतर करण्यात येणाऱ्या रस्ते दुरुस्तीच्या निकृष्ट कामांबाबत वारंवार तक्रारी होत होत्या. त्यामुळे आता रस्ते दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेने स्वतःकडे घेतली आहे. तरी, कंपन्यांकडूनच दर्जेदार दुरुस्ती करून घेऊन काम निकृष्ट झाल्यास बँक गॅरंटी जप्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील अनेक भागांत अनधिकृत ओव्हरहेड केबल्सचे जाळे वाढले आहे. काही केबल्स तुटून किंवा सैल होऊन रस्त्यावर लटकत आहेत. अशा धोकादायक केबल्स तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, काही भागांत कारवाई सुरू आहे.मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका