पुणे

Pune : बाजारात नगरच्या रसरशीत संत्र्यांची चलती!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रसदार आंबट-गोड संत्री म्हटले, की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. फळांच्या प्लेटमधील फोडी असो की ज्यूस, उन्हाच्या तडाख्यात दिलासा देणारे हेही एक फळ. उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या अहमदनगरची संत्री पुण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहेत. घाऊक बाजारात नगरच्या संत्रीला प्रतिकिलो 20 ते 60 रुपये दर मिळत असून, किरकोळ बाजारात 40 ते 120 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात अहमदनगर जिल्ह्यातील पपळगाव, उजनी, शेंडी, पाथर्डी, करंजी आदी भागातून दररोज 50 ते 60 टन संत्री बाजारात दाखल होत आहे. यंदा सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने मृग बहरातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मागणी नसल्याने मोठ्या प्रमाणात फळांची तोड करून पाठविण्यात येत आहे.

परराज्यांची मात्र नगरकडे पाठ

देशातील केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील व्यापार्‍यांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नगर भागातून संत्री खरेदी करण्यात येतात. यंदा त्यांनी आपला मोर्चा नगरच्या तुलनेने स्वस्त व दर्जेदार संत्री असलेल्या राजस्थान व मध्य प्रदेशातील बाजारपेठांकडे वळविला आहे. यंदा उन्हाचा चटका लवकर जाणवू लागल्याने फळांची गळती सुरू झाली आहे. परराज्यांतून खरेदीदारांची रोडावलेली संख्या, त्यात सुरू झालेली गळती, यामुळे येथील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात संत्री पुणे व मुंबईच्या बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे.

उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, संत्र्यांच्या गळतीस सुरुवात झाली आहे. भविष्यात पाणी कमी पडणार असून, टँकरनेही पाणी देणे परवडणार नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्र्यांची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. बाजारात आवक जास्त असली, तरी अन्य भागातील संत्री कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आवक वाढूनही संत्र्यांचे दर टिकून आहेत.

रोहन उरसळ, संत्री व्यापारी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT