प्रसाद जगताप
पुणे: लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर लवकरच पुण्याच्या रस्त्यांवर ओपन गॅलरी बस धावताना दिसणार आहे. या बसच्या छतावर बसून पर्यटक आणि पुणेकर शहराचे विहंगम सौंदर्य अनुभवू शकणार आहेत. या अभिनव संकल्पनेमुळे पुणे शहराचे पर्यटन आणि पीएमपीचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांची ही संकल्पना असून, या ओपन गॅलरी बसचे नाव ‘मेक इन पीएमपीएमएल’ असे ठेवण्यात आले आहे. ही बस पुणे शहरातील जुन्या वास्तुकला शैलीत उभारलेल्या इमारती, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, सांस्कृतिक भवने यांसह पुणे शहराचे बदलते चित्र याचा अनुभव करून देणार आहे.
परदेशांमध्ये अशी संकल्पना पहायला मिळते. न्यूयॉर्क, लंडन या शहरांमध्येही या बस बाहेरून आलेल्या पर्यटकांना अशा सेवा पुरवतात. या बस सेवांचे जगभरात नाव आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) ही सेवा पुरवण्याचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता अशा प्रकारची बस तयार करण्याचे कामही पीएमपीच्या देखभाल दुरुस्ती कार्यशाळेमध्ये सुरू असल्याचे पीएमपी अध्यक्ष देवरे यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पुण्यातील तारा आणि झाडांचे नियोजन कसे असणार?
पुणे शहरामध्ये फिरताना बहुतांश रस्त्यांवर विद्युत तारांचे जंजाळ पाहायला मिळते. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील अक्षरश: बसगाड्यांच्या छताला लागत असल्याचेही चित्र आहे. पीएमपीने जर ही सेवा सुरू केली तर फांद्या आणि विद्युत तारांचा प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने बसच्या नियोजित मार्गावर सेवा सुरू करण्यापूर्वी एक सर्व्हे करून हे अडथळे महापालिका आणि महावितरणच्या मदतीने दूर करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पीएमपीला दरवर्षी मोठी संचलन तूट येत असते. ही तूट कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. त्याचाच भाग म्हणून आम्ही परदेशातील शहरांमध्ये असलेल्या ओपन गॅलरी बसप्रमाणेच एक खास बस तयार करत आहोत. तिच्या छतावर प्रवाशांना बसून शहराचे सौंदर्य पाहता येईल आणि पुणे शहर दर्शनाचा आनंद घेता येईल. या बसचे नाव आम्ही ‘मेक इन पीएमपीएमएल’ असे ठेवणार आहे.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
पीएमपीची ही संकल्पना खूपच चांगली आहे. मी नुकतीच अमेरिकेत जाऊन आले, तेव्हा न्यूयॉर्क शहरात ‘मिडनाईट फेरी’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या या बस राईडचा आम्ही आनंद घेतला होता. पुण्यातही अशीच ओपन गॅलरी असलेली बस ेवा सुरू होत आहे, हे खूपच आनंददायी आहे. यामुळे पुणे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, सोबतच पीएमपी प्रशासनालाही चांगले उत्पन्न मिळेल. बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी ही सेवा उत्तम ठरेल.माधुरी घुले, पुणेकर प्रवासी