Onion News  Pudhari
पुणे

Pune onion prices: लाल कांदा आला अन्‌ दर घसरले; पुण्याच्या घाऊक बाजारात भाव किलोमागे दोन ते तीन रुपयांनी उतरले

राज्यासह स्थानिक बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याने दरांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नव्या लाल कांद्याचा सुरू झालेला हंगाम, पुण्यासह राज्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये वाढलेली आवक अन्‌ परराज्यांतून घटलेली मागणी यामुळे कांद्याचे दर उतरणीला लागले आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांची घसरण झाली आहे. गतआठवड्यात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांवर असलेला कांदा आता ३९ ते ४३ रुपयांवर आला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा विभागात सध्या नवीन आणि जुन्या कांद्याची प्रत्येकी ४० ट्रक अशी मिळून दररोज ८० ट्रक आवक होत आहे. नवीन लाल कांद्याला स्थानिक ग्राहकांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून मागणी होत आहे, तर हॉटेल व्यावसायिकांकडून दर्जेदार जुन्या कांद्याला पसंती दिली जात आहे.

यंदा राज्यातील काही भागांत पाण्याच्या कमतरतेमुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उत्पादन चांगले झाले आहे. आगामी काळात या राज्यांतूनही कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन राहून दरात मोठी वाढ अथवा घट होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नव्या कांद्याची दैनंदिन आवक शंभर ट्रकपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला नाही. त्यातच थंडीचे वातावरण पोषक ठरल्याने नव्या लाल कांद्याचा दर्जा उत्तम आहे. दर्जेदार कांद्याला दक्षिणेकडील राज्यांतून चांगली मागणी असून, अपेक्षित दरही मिळत आहेत. येत्या काळात आवक वाढणार असली, तरी दरात मोठे चढ-उतार होण्याची शक्यता कमी आहे.
- रितेश पोमण, कांदा व्यापारी, मार्केट यार्ड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT