Pune Night School HSC Result Pudhari
पुणे

Pune Night School HSC Result: रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

नोकरी करत शिक्षण पूर्ण; संघर्षातून घडले प्रेरणादायी यशोगाथा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नोकरी करून शिक्षणाची वाट शोधणाऱ्या रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पूना नाईट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर यश मिळतेच, हे त्यांनी दाखवून दिले असून, प्रत्येकाच्या यशाने कौतुक होत आहे.

पूना नाईट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 92.59 टक्के लागला आहे. महाविद्यालयात प्रीतम देशपांडे याने 73.50 टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर, यश कुळे याने 63.83 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर 62.83 टक्के गुण मिळवून ओमकार कदम याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रीतम देशपांडे हा मूळचा सोलापूरचा असून, शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने बारावीला पूना नाईट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून दिवसा नोकरी करून रात्रीचे शिक्षण पूर्ण केले आणि परीक्षेत यश मिळवले आहे.

यश कुळेची कहाणीही अशीच आहे. तो मूळचा कोकणचा असून, शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यामध्ये बहिणीसोबत राहत असून, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो आणि रात्रीच्या वेळेत त्याने शिक्षण पूर्ण केले. अभ्यासासाठी मेहनत घेऊन त्याने यश प्राप्त केले आहे. ओमकार कदम हा मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो, त्यानेही शिक्षणासाठी मेहनत घेतली.

आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 76. 92 टक्के लागला आहे. महाविद्यालयातील आकांक्षा केळकर हिने 58 टक्के, फरिदा तांबोळी हिने 56.83 टक्के आणि चेतन सपकाळे याने 56 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.आकांक्षा हिला लग्नानंतर कुटुंबाची, मुलांच्या जबाबदारीमुळे शिक्षण घेता आले नाही. पण, तिने शिक्षणाच्या जिद्दीने पुढे अत्रे महाविद्यालयात प्रवेश घेतला, मेहनत घेतली आणि बारावीत यश मिळवले आहे.

संघर्षाला यशाची जोड

शुक्रवार पेठेत राहणाऱ्या मनीषा झुजम यांचे शिक्षण अपूर्ण राहिले. पण, मनात इच्छा होती. त्यामुळे 22 वर्षांनंतर त्यांनी पूना नाईट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्या पुणे महापालिकेमध्ये नोकरी करतात आणि संघर्षमय जीवन जगत असताना मेहनत घेऊन त्यांनी बारावीच्या परीक्षेत 53 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT