पुणे

Pune News : बेशिस्त बसचालकामुळे कोंडीत भर !

Laxman Dhenge

पुणे : नो-पार्किंगमध्ये बस उभ्या करणे, रस्त्यावर चालवताना लेनची शिस्त न पाळता एकाच वेळी शेजारी-शेजारी बस चालविणे, रस्त्यात बस थांबवून इतर वाहनचालकांना रस्ता न देणे, बसथांब्यावर व्यवस्थित बस न थांबविणे, वेगाने गाडी चालविणे असे सर्रास प्रकार पीएमपीचे चालक करत आहेत. त्यांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार बस गाड्या आहेत. त्यामार्फत दररोज बारा ते तेरा लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. पुणे शहरातील निम्यापेक्षा जास्त नागरिकांसाठी पीएमपी ही लाईफलाईन आहे. मात्र, चालकांच्या वाढत्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, या बसगाड्यांद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरीय भागांमध्ये वाहतूक कोंडीत भर पडत असून, इतर वाहनचालकांना या कोंडीतून काढताना मार्ग काढताना नाकीनऊ येत आहेत.

कधी-कधी तर या बसचालकांच्या बेशिस्तपणामुळे रुग्णवाहिकादेखील कोंडीत अडकून पडत आहेत. त्यामुळे बसचालकांना शिस्त लागण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. आता नव्याने पदभार घेतलेले अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर या बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यात यशस्वी होणार का, हे पहावे लागणार आहे.

शिवाजी पुलाखालीच सर्वाधिक बेदरकारपणा

पुणे महानगर पालिकेला जोडणार्‍या शिवाजी पुलाखाली पीएमपीने स्थानक केले आहे. मात्र, पीएमपीचे चालक या पुलाखालीच सर्वाधिक बेशिस्तपणा करत असल्याचे दिसत आहे. या पुलाखालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूला पीएमपीच्या बसगाड्या अस्ताव्यस्त लागलेल्या असतात. यात महत्त्वाचे म्हणजे चालक भररस्त्यातच गाडी पार्क करून जात असल्याचे गुरुवारी (दि. 23) सायंकाळच्या सुमारास पाहायला मिळाले. भररस्त्यातच बस उभ्या करणे चुकीचे असून, या भागात कोंडी करणार्‍या बसगाड्या हटवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

मध्यवस्तीतून जाताना लेन शिस्त हवी

मध्यवस्तीतील अरुंद रस्ते, येथील बाजारपेठा, शाळा-कॉलेज यामुळे अगोदर येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यातच पीएमपीच्या बेशिस्त चालकांमुळे या मार्गांवर मोठी कोंडी होत आहे. या मार्गावरून जाताना पीएमपी चालकांनी लेनची शिस्त पाळणे आवश्यक असून, प्रशासनानेही मध्यवस्तीतून मोठ्या आकाराच्या (12 मीटर लांबीच्या) बसमार्गावर पाठवू नयेत, अशी मागणी होत आहे.

जुन्या बाजार रस्त्याच्या सुरुवातीलाही बेशिस्तपणा

मंगळवार पेठेच्या हद्दीत असलेल्या जुना बाजार रस्त्याच्या सुरुवातीला (शनिवारवाड्याकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाताना) पीएमपीने येथे स्थानक बनविले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले हे स्थानक वाहनचालकांसाठी आता अडचणीचे बनत चालले आहे. येथे कार्यरत असलेले बसचालक बेशिस्तपणे रस्त्यावर येतील अशा प्रकारे बस उभ्या करत आहेत. तसेच, येथे 'पीक अवर'ला बसगाड्यांच्या पार्किंगमुळे प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे येथील पीएमपीच्या स्थानकाचे दुसरीकडे स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

  • पीएमपीच्या आगारांची संख्या : 15
  • ताफ्यातील बससंख्या : 2080
  • मार्गावरील बससंख्या : 1600 ते 1700
  • किती आहेत मार्ग : 381
  • बसच्या नियोजित फेर्‍या (रोजच्या) : 19,931
  • प्रत्यक्ष मार्गावरील फेर्‍या (रोजच्या) : 19,489

कात्रज चौकातही नियमांची ऐशीतैशी

पीएमपीचे बसचालक स्थानक परिसरातच सर्वाधिक बेशिस्तपणा करत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. कात्रज चौकात असलेल्या बसस्थानक परिसरातसुद्धा पीएमपीचे बसचालक अस्ताव्यस्त बसचे पार्किंग करत आहेत. तसेच, येथील सिग्नलचेदेखील त्यांच्याकडून पालन होत नसून, इतर वाहनांची पर्वा न करता सर्रासपणे मुख्य चौकात यू टर्न घेत आहेत. त्यामुळे येथेही चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT