पुणे

Pune News : बंधार्‍यावरून प्रवास ठरतोय धोकादायक

Laxman Dhenge

नानगाव : पुढारी वृत्तसेवा : हातवळण (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधार्‍यावरून धोकादायक प्रवास नागरिक करीत आहेत. या बंधार्‍यावरून चारचाकी व दुचाकी अशी वाहने दिवसरात्र ये-जा करतात. बंधार्‍याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे संरक्षक कठडे उभे करण्याची मागणी होत आहे.

दौंड व शिरूर तालुक्यांतून वाहणार्‍या भीमा नदीवर पाणी अडविण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून बंधारे बांधण्यात आलेले आहे. पाणी साठविण्याबरोबरच दौंड व शिरूर तालुक्यांतील लोकांना ये-जा करण्यासाठीदेखील या बंधार्‍यांचा उपयोग होऊ लागला. मात्र, नागरिक या बंधार्‍यावरून चारचाकी वाहने घेऊन जात असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनत आहेत.

बर्‍याच ठिकाणी बंधार्‍यावर सुरुवातीच्या काळात लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. कालांतराने या लोखंडी संरक्षक कठड्यांची मोडतोड झाली असून, सध्या बंधार्‍यांवर संरक्षक कठडे नाहीत. दिवसेंदिवस बंधार्‍यावरील वाहतूक वाढत चालली आहे. दुचाकी, चारचाकी अशी वाहतूक होत आहे. मात्र, ही वाहतूक धोकादायक होत असून, यामुळे मागील काळात ठिकठिकाणी छोटे अपघातदेखील झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

येथील बंधारा हा हातवळण (ता. दौंड) व सादलगाव (ता. शिरूर) या दोन गावांना जोडणारा आहे. या बंधार्‍यावरूनदेखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. या बंधार्‍यावर एका वेळेस एकच चारचाकी वाहन ये-जा करू शकते. मात्र, चारचाकी वाहन प्रवास करताना दुचाकीस्वारांना एका कडेला उभे राहावे लागते. बंधार्‍याला संरक्षक कठडे नसल्यामुळे बंधार्‍याच्या एका कडेला उभे राहणेदेखील धोकादायक आहे. एका बाजूला खोल नदीपात्र, तर दुसर्‍या बाजूला पाण्याने भरलेले नदीपात्र त्यामुळे प्रवास करताना भीतीदेखील वाटते. परिणामी, या ठिकाणी संरक्षक कठडे बांधण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT