पुणे : एका महिन्यात जवळपास 80 ते 100 नवीन पुस्तके येत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल… पण, हे खरंय.. पुस्तकविश्वात दररोज नव्या विषयांवरील पुस्तकांची भर पडत असून, प्रकाशन संस्थांकडून कविता संग्रह असो, वा माहितीपर पुस्तके, अशा विविध पुस्तकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. गेल्या वर्षभरात अंदाजे साडेचार ते पाच हजार नवीन छापील पुस्तके प्रकाशित झाली असून, एका प्रकाशकाकडून महिन्याभरात 10 ते 20 पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. पुस्तकविश्व पूर्वपदावर आले आहे. कोरोनामुळे साहित्यविश्वासह पुस्तकविश्वही ठप्प झाले होते.
परंतु, मागील वर्षी कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुस्तकविश्वाची गाडी रुळावर आली आहे. नव्या छापील पुस्तकांची निर्मिती वाढली असून, कथा, कांदब-या, प्रवासवर्णनांसह सध्याला माहितीपर, ऐतिहासिक, मोटिव्हेशनल, अशा विविध विषयांवर पुस्तके येत आहेत. पुण्यात रोज किमान तीन ते चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी संस्थांकडून सोशल मीडियाचा वापर होत आहे.
पुस्तक विक्रीपासून ते प्रकाशनाच्या कार्यक्रमापर्यंतच्या माध्यमातून पुस्तकांची प्रसिद्धी केली जात आहे. त्याशिवाय टीझर, व्हिडिओही तयार केले जात असून, संस्थांची सोशल मीडिया टीम त्यासाठी जोमाने काम करत आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, वर्षभरात पुस्तकविश्वात अंदाजे साडेचार ते पाच हजार नव्या पुस्तकांची भर पडली. यंदाचे वर्ष प्रकाशन संस्थांसाठी फायद्याचे असून, त्यामुळे संस्थांकडून नव्या पुस्तकांची निर्मिती होत आहे. पुस्तके वाचणार्यांची संख्याही वाढली असल्याने पुस्तकांचा खप वाढला आहे, तर पुस्तकनिर्मितीही वाढली आहे. राज्यभरात 200 ते 300 प्रकाशक पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
सध्या पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशक सोशल मीडियाचा वापर करत असून, त्यामुळेही पुस्तकांची प्रसिद्धी होऊन खप वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम असो वा यू-ट्युब चॅनेलवरील व्हिडिओ याद्वारे पुस्तकांची प्रसिद्धी होत आहे आणि नव्या लेखकांच्या पुस्तकांना त्याचा फायदा होत आहे. याशिवाय प्रकाशन संस्थांकडे नवीन पुस्तके छापून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे.
– चेतन कोळी, प्रकाशक
पुस्तकनिर्मितीसाठी यंदाचे वर्ष खूप चांगले आहे. प्रकाशक संस्थांच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे. आम्ही वर्षभरात जवळपास 140 पुस्तके प्रकाशित केली असून, आता काही नवी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पुस्तकविश्वासाठी ही खूप चांगली गोष्ट खूप आहे.
– अखिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस
हेही वाचा