पुणे

Pune News : विश्रांतवाडीतील स्काय वॉकचे होणार स्थलांतर

अमृता चौगुले

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे पादचार्‍यांसाठी उभारलेल्या स्काय वॉकचे (पादचारी पूल) स्थलांतर जवळच असलेल्या प्रतीकनगर चौकात करण्यात येणार आहे. तसेच काही भाग (लोखंडी सांगाडा) शिवाजीनगर येथील रस्त्यावर वापरण्यात येणार आहे.

दहा वर्षांपूर्वी पादचार्‍यांच्या सोयीसाठी या ठिकाणी स्काय वॉक उभारण्यात आला होता. मात्र, रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ, अनेकदा चालू नसलेली लिफ्ट आदी कारणांमुळे पदाचार्‍यांकडून क्वचितच 'स्काय वॉक'चा वापर होत होता. धानोरी, लोहगाव, विद्यानगर, पुणे-आळंदी रस्ता व विमानतळ रस्त्यावरील रहदारीची समस्या सोडविण्यासाठी लवकरच या चौकात ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येथील स्काय वॉक काढून टाकावा लागणार आहे.

आमदार सुनील टिंगरे म्हणाले, 'हा स्काय वॉक आळंदी रस्त्यावरील 'विंग्ज ट्रॅव्हल्स'चे कार्यालय ते सिंधूसागर हॉटेल येथील प्रतीकनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर स्थलांतरित करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.' रिक्षाचालक कैलास काटे म्हणाले की, प्रतीकनगरकडे वळणार्‍या रस्त्यावरील बाजारपेठ, हॉस्पिटल, मोहनवाडी-प्रतीकनगर भागातील नागरिक तसेच येथे असणार्‍या महापालिका व खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय होणार आहे. सध्या जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. आळंदी रस्त्यावरील वाहनांचा वेग खूप असतो. विशेषतः शाळकरी मुले व वृद्ध यांची सोय होईल.

विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे येथील स्काय वॉकचे स्थलांतर आळंदी रस्त्यावरील प्रतीकनगर येथे करण्यात येणार आहे. या पुलाचा काही भाग शिवाजीनगर येथील 'सीईओपी'चे वसतिगृह, मैदान परिसरात वापरण्यात येणार आहे.

– श्रीनिवास बोनाला,
मुख्य प्रकल्पाधिकारी, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT