पुणे

Pune News : खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी ‘स्ट्रीट फूड झोन’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 'स्ट्रीट फूड झोन' (खाऊ गल्ली) तयार करण्यासाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेरीवाला समितीमधील तीन सदस्यांची एक उपसमिती तयार केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी खाऊ गल्ली निर्माण झाल्या आहेत. या खाऊ गल्लींच्या ठिकाणी होणार्‍या गर्दीमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या खाऊ गल्लींच्या ठिकाणी कारवाई केली जाते.

या पार्श्वभूमीवर शहरात 'स्ट्रीट फूड झोन' तयार करण्याचा निर्णय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी एक उपसमिती तयार करण्यात येणार आहे. ही समिती शहरात पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. तसेच धोरणात काय असावे, याची शिफारस करणार आहे. या स्ट्रीट फूड झोनमध्ये संबंधित भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आणून व्यवसायाकरिता जागा दिली जाईल. तेथे पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी सिलिंडरचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे, त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण दूर होण्यास मदत होईल.

या धोरणासंदर्भात व्यवसायिक संघटनांकडून ही सूचना येऊ लागल्या आहेत. "महापालिकेने स्ट्रीट फूड झोन' तयार करण्यासाठी धोरणासंदर्भात संघटनेने महापालिकेला काही लेखी सूचना केल्या आहेत. या झोनची निर्मतिी उच्च, मध्यम, साधारण आणि सर्व साधारण अशा चार श्रेणीत करावी. झोनसाठी जागा निश्चित करताना, महापालिकेच्या पथ, ड्रेनेज, विकास योजना, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्थानिक पोलिस यांच्याकडून पाहणी केली जावी. या जागा शक्यतो उद्यान, बाजार पेठ, एसटी किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या स्थानकाजवळ असावी, त्यानंतर शाळा, रुग्णालय, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरातही असावी, अशी मागणी जाणीव संघटनेचे संजय शंके यांनी केली आहे."

हेही वाचा

SCROLL FOR NEXT