कडूस : खेड तालुक्यात सार्वजनिक वाहतूक सेवेच्या (एसटी बस) अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवड्यापूर्वी कडूस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, सोमवारी (दि. ६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक अपघात घडला.
वाशेरे गावाहून निघालेली एसटी बस (एमएच १४ बीटी ५०८१) चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने थेट गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील खड्ड्यात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाले नाहीत.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थ आजही सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसला प्राधान्य देतात. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये एसटी बसच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे या विश्वसनीय सेवेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी याच परिसरात, निर्मळवाडी-सुपेवाडी-तळपेवस्तीजवळ एसटी बसचा (एमएच १४ बीटी ४६८५) ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला होता. बस वेगात असल्याने चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या परिसरात गेल्या काही दिवसांत अपघातांची मालिकाच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना एक पिकअप गाडी १०० फूट खोल दरीत कोसळून १२ महिलांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, कडूस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर २७ जून रोजी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन नाल्यात गेले होते. तत्पूर्वी, १४ जून रोजी कारचा अपघात, १५ जून रोजी नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात जाणे आणि २७ जून रोजी पुन्हा एका कार चालकाचे नियंत्रण सुटून वाहन नाल्यात जाणे अशा घटना घडल्या आहेत. त्याच दिवशी घाट उतरताना कारने खांबाला धडक दिली होती. या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
अपघातांची वारंवारता वाढलेली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.
हा रस्ता गावापासून जुन्या बैलगाडा घाटापर्यंत सिमेंट काँक्रिटचा आहे. रस्त्याची उंची वाढलेली असून, बाजूचे नाले आणि गटारे खोल झालेले आहेत. त्यातच एका कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्याने नाल्याची रुंदी वाढली आहे.
समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्यासाठी चालकाने आपले वाहन किंचित जरी खाली घेतले, तर ते थेट नाल्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी रस्त्याच्या साइडपट्ट्यांची दुरुस्ती करून नाल्यांमध्ये पाइप टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.