सुहास जगताप
पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात पहिल्यांदाच दिवंगत अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षातील तालुका व गावपातळीवरील नेत्यांनी पक्षनेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. बारामतीत प्रथमच पवार नावाच्या 'पॉवर सेंटर'ला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासमोर 'ब्र' काढण्याची ज्यांची हिंमत होत नव्हती, त्यांनीच आता बंडाचे निशाण फडकावले आहे. 'पवार' नावाच्या 'पॉवर सेंटर'ची ताकद कमी होत चालल्याची ही नांदी तर नाही ना? अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपची मदत घेत आणि नाराजीची काही कारणे पुढे करत थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आव्हान दिले. दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल या निवडणुकीत असतानाही त्याच पक्षाचे पुरंदर तालुक्यातील नेते सुदामराव इंगळे आणि माणिकराव झेंडे यांनी जगतापांना साथ दिली. अजितदादांच्या पक्षातील या असंतोषाचा फायदा राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या भाजपने पुरेपूर उठवला आहे.
राज्य आणि देशपातळीवरील राजकारणात अतिशय शक्तिशाली घराणे म्हणून पवार कुटुंबाची ओळख आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजितदादा यांनी ही ओळख निर्माण करताना बारामतीत एकछत्री अंमल प्रस्थापित केला होता. कोणत्याही निवडणुकीत हे दोन नेते म्हणतील तीच पूर्वदिशा असायची.
अलीकडच्या काळात तर अजितदादा म्हणतील तेच होत असे; दादांसमोर कोणाचीही 'ब्र' काढण्याची हिंमत नव्हती. मात्र, आता 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत स्थानिक नेते डोळे वटारू लागले आहेत, याचा पवारांच्या दोन्ही गटांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
अजित पवारांनंतर आणि शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे आलेल्या मर्यादांचा विचार करता, पवारांच्या पुढच्या पिढीने या 'पॉवर सेंटर'चा दरारा कायम राखणे गरजेचे होते; परंतु तसे होताना दिसत नाही.