पुणे

Pune News : सतारवादन अन् दमदार गायकीने जिंकली मने!

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहिल्यांदाच सादरीकरण करणार्‍या रजत कुलकर्णी यांच्या गायकीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाची दमदार सुरुवात झाली अन् ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांच्या जबरदस्त गायकीने रसिकांना सुरांचा प्रवास घडवला. तर पं. नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले अन् रसिकांनीही उभे राहून त्यांच्या वादनाला उत्स्फूर्त दाद दिली. तर पं. अजय पोहनकर यांच्या गायकीनेही रसिकांची मने जिंकली.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी रसिकांची मोठी गर्दी झाली. या वेळी गायन आणि वादनाचा सुरेल मिलाप अनुभवायला मिळाला.  तिसर्‍या दिवसाची सुरुवात रजत कुलकर्णी यांच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली. मधुवंती रागात त्यांनी 'हू तो तोरे कारन' हा ख्याल मांडला. 'एरी आयी कोयलिया बोले' या द्रुत बंदिशीतून त्यांच्या तयारीचे, लयकारीचे दर्शन घडले. रजत यांनी स्वरभास्कर  पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून कन्नड भजन सादर केले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'सावळे सुंदर रूप मनोहर' हा संत श्रीतुकाराम महाराज यांचा अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती रागात 'पिया बिन मोहे' ही बंदिश रूपक तालात सादर केली. तसेच 'माते सरस्वती ' ही स्वरचित बंदीश तीनतालात पेश केली. पद्माताईंनी 'गोपालसारंग' या रागाची निर्मिती केली आहे. या रागात त्यांनी 'संग लीनो बालगोपाल' ही बंदिश त्रितालात सादर केली. हा नवा राग देस राग आणि वृंदावनी सारंग या रागांच्या मिश्रणातून त्यांनी तयार केला आहे. मिश्र पहाडीमधील 'घिर घिर बदरा काले छाये' ही कजरी सादर करून पद्माताईंनी विराम घेतला. त्यांना श्रुती देशपांडे व ऐश्वर्या देशपांडे यांनी स्वरसाथ केली.

सवाईच्या मंडपात रसिकांची हाऊसफुल्ल गर्दी

सतारवादक  पं. नीलाद्री कुमार यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. स्वरमंचावरील त्यांच्या आगमनाची रसिकांना उत्सुकता होती. त्यांच्या सतार वादनाने रसिकांची  दाद मिळवली. ज्येष्ठ सतारवादक  पं. रविशंकर रचित 'यमन मांझ' रागाने नीलाद्री यांनी वादनाला आरंभ केला. विलंबित लयीवर कमालीचे प्रभुत्व दर्शवणार्‍या त्यांच्या वादनाने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली. राग पंडित रविशंकर यांचा, पण राग विचार आणि रागमांडणी नीलाद्री यांची स्वतःची असल्याने त्यांच्या वादनाने स्वरमंडपात चैतन्य निर्माण केले. प्रत्येक आवर्तनाला रसिक टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते. वादनाच्या अखेरीस त्यांनी रसिकांच्या आग्रहाला मान देत धून पेश केली. त्यांच्या वादनाला सत्यजित तळवलकर यांनी अतिशय पूरक अशी तबलासाथ करून मैफलीची रंगत वाढवली.

पं. अजय पोहनकर यांच्या अनुभवसिद्ध सादरीकरणाने महोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाची सांगता झाली. पं. पोहनकर यांच्यासह त्यांचे पुत्र आणि की – बोर्ड वादक अभिजित पोहनकर यांचा वादन सहभागही रंगत वाढविणारा ठरला. या अनोख्या गायन वादनाच्या निमित्ताने 'सवाई'च्या स्वरमंचावर प्रथमच की – बोर्डचे सूर निनादले. पं. अजय पोहनकर यांनी 'दरबारी' रागात विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी केली. पहाडी रागात 'सैया गये परदेस' ही रचना पोहनकर पिता-पुत्राने एकत्रित पेश केली. कंठसंगीतासह की – बोर्ड असा वेगळा नादानुभव यानिमित्ताने रसिकांनी अनुभवला. भैरवीमध्ये 'नैना मोरे' ही रचनाही त्यांनी सोबतीने सादर केली आणि 'बाजूबंद खुल खुल जाए' या रचनेने सांगता केली.

वडिलांनी दिली पुत्राच्या सादरीकरणाला दाद

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाच्या उत्तरार्धात सतारवादक पं. नीलाद्री कुमार यांच्या सतारच्या झंकारांनी स्वरमंडपात चैतन्यलहरी उसळल्या. त्यांचे वादन सुरू असताना स्वरमंडपात नीलाद्री कुमार यांचे वडील ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिक कुमार यांचे आगमन झाले. वडिलांचे अचानक येणे नीलाद्री यांनाही आश्चर्यचकित करणारे होते…वडिलांचे आगमन होताच नीलाद्री यांनी 'बाबांनी लहानपणी शिकवलेली धून सादर करतो' असे सांगून एक छोटेखानी रचना पेश केली. पुत्राच्या सादरीकरणाला वडिलांनीही उत्स्फूर्त दाद दिली. हा अचानक जुळून आलेला योग प्रत्येकासाठी खास होता.
'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा माझ्यासाठी केवळ मंच नाही तर मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला मंदिरात जातो तसा मी येथे येतो. मी जगभरात, भारतभर सादरीकरण करतो. मात्र, सवाईसारखा महोत्सव आणि पुण्यासारखे रसिक श्रोते कोठेच नाहीत. आज माझे वडीलदेखील येथे मला ऐकायला आले हे माझ्यासाठी सरप्राईज होते. श्रीनिवास जोशी यांनी ते येत आहेत म्हणून मला 15 मिनिटे वेळ वाढवून दिली ती का दिली हे माझे वडील आल्यावर समजले.
– पं. नीलाद्री कुमार, सतारवादक
हेही वाचा
SCROLL FOR NEXT