पुणे पुस्तक महोत्सवाचे आज होणार उद्घाटन

पुणे पुस्तक महोत्सवाचे आज होणार उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुणे पुस्तक महोत्सव आज (दि.16) पासून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते 4 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली देशाच्या संविधानाची प्रत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्तलिखित, भगतसिंग यांचे हस्तलिखितही पुणेकरांना या महोत्सवात पाहता येणार आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील 250 विविध संस्थांनी पाठिंबा दिला आहे. महोत्सवात दहा भारतीय भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने असणार आहेत. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील खुला रंगमंच आणि अ‍ॅम्पी थिएटर येथे होणार आहेत.

हा महोत्सव 24 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले, की पुणे शहरात वाचनसंस्कृतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार्‍या पुस्तक महोत्सवानंतरचा भव्य महोत्सव पुण्यात होत आहे. नव्या पिढीला पुस्तकांकडे, वाचनाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्योजक जय काकडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे या महोत्सवासाठी सहकार्य लाभले आहे.

पार्किंगची व्यवस्था

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने फर्ग्युसन मैदानावर येणार्‍या नागरिकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर आणि नवमल फिरोदिया लॉ कॉलेजच्या परिसरात करण्यात आली आहे. बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर येण्यासाठी आघारकर रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातून (गुडलक चौक) येता येईल. नवमल फिरोदिया लॉ कॉलेजच्या परिसरात ज्ञानेश्वर पादुका चौकातून; तसेच तुकाराम पादुका चौकातून येता येईल. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातून पायी ये-जा करता येणार आहे.

आज 'जयतू भारत'चा विश्वविक्रम

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आज
शनिवारी सकाळी 11 वाजता सुमारे 15 हजार पुस्तकांच्या माध्यमातून 'जयतू भारत' हे वाक्य तयार करण्यात येणार आहे. या विक्रमाची नोंदही गिनीज बुक रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

पुस्तक प्रदर्शनात विविध
भाषांतील पुस्तकांची 200 दालने
पुणेकरांना वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी

महोत्सवात होणारे कार्यक्रम

  • महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम,
  • संगीत कार्यक्रम, चर्चा, व्याख्यान असे विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत.
  • गायक नंदेश उमप यांचा 'लोकरंग' हा सांस्कृतिक कार्यक्रम.
  • डॉ. माधवी वैद्य यांचा 'सुट्टी आली, सुट्टी आली' हा कार्यक्रमय
  • 'तुकाराम दर्शन' हे महानाट्य.
  • हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे व्याख्यान.
  • 58 स्वातंत्र्यसैनिकांवरील 'कारागृहातील कल्लोळ' हा कार्यक्रम, लष्कराच्या बँडचे सादरीकरण, अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते,
  • विश्वास पाटील यांचा सहभाग असलेला 'आमचा वाचन कारभार' हा चर्चात्मक कार्यक्रम.
  • पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद, लेखक विक्रम संपत यांचे व्याख्यान.
  • 'फैजल' हा काश्मिरी गीतांचा कार्यक्रम.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत.
  • शिवराज्याभिषेकावर आधारित 'श्रीमंत योगी' हे महानाट्य.
  • डॉ. सोनल कुलकर्णी यांचा मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन.
  • अ‍ॅड. आशिष शेलार, सतेज पाटील, डॉ. नीलम गोर्‍हे, सिद्धार्थ शिरोळे यांचा सहभाग असलेला 'राजकीय नेते काय वाचतात' हा
  • चर्चात्मक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news