पुणे

Pune News : रमेश महाले यांनी देशाचा सन्मान उंचावला : उज्ज्वल निकम

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करतेवेळी पोलिसांवर मोठे दडपण होते. याच काळात राजकीय स्थित्यंतरेदेखील होत होती. या दरम्यान अनेक गंभीर प्रसंग आले. मात्र, रमेश महाले यांच्यासारखे सौजन्यशील, हुशार आणि प्रामाणिक अधिकारी असल्याने कसाबच्या माध्यमातून पाकिस्तानचा चेहरा संपूर्ण जगासमोर उघडा पडला. त्यांच्यासारखे अधिकारी असल्यानेच जगभरात मुंबई पोलिसांची आणि देशाची मान उंचावली, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केले.

पुण्यात मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांना महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी कै. वसंतराव ढुमणे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा 'कृतज्ञता सन्मान' अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ढुमणे यांचे पुत्र अजय ढुमणे, नीलेश सोनिगरा फाउंडेशनचे नीलेश सोनिगरा, सोहनलाल सोनिगरा आदी उपस्थित होते. यानंतर निवेदक राजेश दामले यांनी महाले यांची प्रकट मुलाखत घेतली.

निकम म्हणाले, तपास सुरू असताना मला अनेक वेळा माहितीच्या नोंदी लागायच्या तेव्हा मी पहाटे 5 असो की 6 कधीही महाले यांना फोन करायचो आणि ते प्रत्येक वेळी आवश्यक माहिती मला उपलब्ध करून द्यायचे. महाले यांसारख्या अधिकार्‍यांकडून आज प्रत्येक नवोदित पोलिस अधिकारी प्रेरणा घेईल. चांगल्या अधिकार्‍यांचे कौतुक व्हायलाच हवे. अशाच कर्तबगार अधिकार्‍यांही देशाला गरज आहे.

पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करण्यात यश

कसाब हा अत्यंत हुशार आणि चलाख होता. कोर्टात सुरू असलेल्या सर्व गोष्टी तो निरखायचा. असे सांगत महाले म्हणाले की, साक्षीदारांना भीती वाटायची की आपण साक्ष दिल्यास दाऊदची लोकं आपल्याला मारतील. परंतु त्यांना आम्ही विश्वासात घेतले, न्यायालयात उभे राहिल्यानंतर आमचा एकही साक्षीदार फुटला नाही हे विशेष. पाकिस्तान पुरस्कृत हल्ले आपल्याकडे 2008 च्या आधीही होत होते नंतरही झाले. मात्र, पाकिस्तानचा यामध्ये असलेला सहभाग सिद्ध झाला नाही. या तपासात आम्हाला ते यश मिळाले. तुकाराम ओंबाळे शहीद झाले. तो प्रसंग सांगताना सभागृह स्तब्ध झाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT